अज्ञाताविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल
राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील पाचल येथील ऐतिहासिक पाचलोबा मंदिर परिसरातून लाखो रुपयांच्या झाडांची बेकायदा तोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय जमिनीवरील मनाई आणि बिगरमनाई जातीची एकूण ९५ झाडे कोणत्याही परवानगीशिवाय तोडून सुमारे २ लाख ८६ हजार ५३० रुपयांची चोरी करण्यात आली आहे.
पाचल सजाचे ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण शामराव नरके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पाचल गावातील पाचलोबा मंदिर परिसर, ज्याला ‘पाचलोबाची राई’ म्हणून ओळखले जाते (सर्व्हे नं. ८०५), ही शासकीय जमीन आहे. या जमिनीवर दि.२५ डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुणाचीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली. चोरट्यांनी या परिसरातून मनाई जातीची २५ झाडे, बिगरमनाई जातीची ७० झाडे ही झाडे तोडून नेली आहेत. अशा एकूण ९५ झाडांची कत्तल करून २ लाख ८६ हजार ५३० रुपयांच्या लाकडाची चोरी करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत तलाठी लक्ष्मण नरके यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शासकीय जमिनीवरील आणि देवराईसारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या परिसरातील या वृक्षतोडीमुळे परिसरात संताप व्यन्म होत आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.












