राजापूर शहरात मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांची दहशद

 

नागरिक, व्यापारी व वाहन चालक त्रस्त

नगर परिषद प्रशासन मात्र ढीम्म

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहरात जवाहर चौकासह सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ता, बाजारपेठ परिसर यांसह विविध भागात फिरणाऱ्या मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गुरे व कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक, व्यापारी व वाहन चालक पुरते त्रस्त झाले असून यामुळे गंभीर अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. झुंडीने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे वृध्द, महिला व शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या एकूणच परिस्थिती बाबत नगर परिषद प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजापूर शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. राजापूर शहरात जवाहर चौक, शहर बाजारपेठ, तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्यासह एसटी डेपो परिसर, रानतळे, नवजीवन हायस्कुल परिसरासह अन्य भागात मोठया प्रमाणावर मोकाट गुरांचा उपद्रव वाढला आहे. सायंकाळी तर अनेक ठिकाणी ही मोकाट गुरे तळ ठोकून रस्त्यातच बसत असल्याने वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. त्यातच गंभीर अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. महिनाभरापुर्वी एसटीडेपो परिसरात अशाच प्रकारे एका गाभण गायीचा मृत्यु झाला होता. तर बुधवारी मुख्य रस्त्यावर एका गाभण गायीने वासरला जन्म दिला होता. काही जागरूक प्राणीप्रेमींमुळे त्या गायीच्या मालकाचा शोध घेऊन ती गाई व वासरू त्या मालकाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र अशा प्रकारे गुरांना राजरोसपणे सोडून लावणाऱ्या मालकांविरोधात कठोर कारवाईची आवश्यकता असताना न. प. प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे.

मोकाट गुरांचा बंदोबस्त करताना त्यांना जेरबंद करून ठेवण्यासाठी यापुर्वी न. प. कडे कोंडवाडा होता, मात्र काही वर्षापुर्वी तोडण्यात आलेला हा कोंडवाडा अद्यापही बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे गुरे पकडून ठेवणार कुठे असा प्रश्न निर्माण झाल्याने न. प. प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. मात्र याचा नाहक मनस्ताप शहरवासीयांना होत आहे. तर अशा प्रकारे गुरे पाळताना त्यांची योग्य प्रकारे देखभाल करता येत नसेल तर मग ती पाळता कशाला असाही प्रश्न उपस्थित केला जात असून अशा बेजबाबदार गुरांच्या मालकांवर कारवाई करावी अशीही मागणी होत आहे.

मोकाट गुरांप्रमाणेच शहरात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यापुर्वी दोन वेळा शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण करण्यात आले. त्यावर न. प. प्रशासनाने लाखो रूपये खर्च केले. मात्र त्यातुन काहीच साध्य झाले नाही अशी परिस्थिती सध्या शहरा भटक्या कुत्र्यांच्या झुंडी पाहिल्यावर दिसून येत आहे. या कुत्र्यांमुळे नागरिक,व्यापारी, वाहन चालकांबरोबरच महिला, वृध्द व शाळकरी मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच काही प्राणीमित्रांचे या भटक्या कुत्र्यांवरील प्रेम कधी कधी जास्तच होत असून त्यांना एकत्र करून खाणे घालण्याच्या प्रकारामुळे जवाहर चौकात भर गर्दीत या भटक्या कुत्र्यांनी आपले बस्तान बसविले आहे. सकाळी व सायंकाळी तर या भटक्या कुत्र्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पहावयास मिळते. याचा उपद्रव नागरिकांना होत आहे.

मुक्या प्राण्यांवर दया करणे हा माणसुकीचा धर्म आहेच पण अशा प्रकारे शहरात मोकाट फिरणारी गुरे व भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणारा नाहक त्रास व मनस्तापही दुर्लक्षित करता येणार नाही. मोकाट गुरांच्या मालकांचे यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे तर या भटक्या कुत्र्यांचाही बंदोबस्त करणे गरजेचे आहे. मात्र या एकूणच प्रकरणी ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते नगर परिषद प्रशासन मात्र आंम्हाला काही देणं घेणं नाही या भूमिकेत आहे. त्यामुळे नागरिकांतुन तीव्र संतापही व्यक्त होत आहे.