शरद पवार यांची पत्राद्वारे कुमार शेट्ये यांच्या प्रति भावनिक श्रद्धांजली
रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती कुमार शेट्ये यांचे आज शुक्रवारी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. कुमार शेट्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते! शेवटपर्यंत त्यांनी पवार यांची साथ सोडली नाही. हीच जाणीव त्यांच्या नेत्याला अर्थात शरद पवार यांनाही होती. म्हणूनच कुमार शेट्ये यांच्या निधनाची माहिती तत्काळ शरद पवार यांना समजली आणि त्यांनी तितक्यच तातडीने आपल्या संवेदना आणि श्रद्धांजलीचे पत्र सुरज शेट्ये यांना पाठवत आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहिलेल्या श्रद्धांजलीपर पत्रात म्हटले आहे कि, “रत्नागिरी जिल्ह्यातील माझे ज्येष्ठ सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास उर्फ कुमार शेट्ये यांचे आज दीर्घ आजाराने देहावसान झाल्याची बातमी समजली. श्री. कुमार शेट्ये हे प्रकृतीची समस्या असली तरीही सार्वजनिक कामाच्या निमित्ताने सतत संपर्कात असायचे. त्यांची हि जीवननिष्ठा माझ्या कायम स्मरणात राहील. कुमार शेट्ये यांच्या सारखा विनम्र, प्रामाणिक आणि निष्ठावंत सहकार्याचे जाणे दुःखदायक बाब आहेच परंतु तुम्हा शेट्ये कुटुंबियांवर त्याहून मोठा आघात झाला आहे. यातून सावरण्याचे बळ आपणास आणि आपल्या कुटुंबास मिळो तसेच कुमार शेट्ये यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि प्रार्थना!”
या शब्दांत शरद पवार यांनी आपल्या संवेदना कुमार शेट्ये यांचे सुपुत्र सुरज शेट्ये यांना पत्राद्वारे कळविल्या आहेत.












