भारताला जागतिक महासत्ता बनविण्यात युवाशक्तीचे मोलाचे योगदान राहील : शिवांगी खरवाल

अभाविपच्या जाहीर सभेत युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना जागृत

तीन ‘ डी ‘ च्या माध्यमातून घुसखोरांना हूसकावून देश सुरक्षित करणे ही आपली जबाबदारी

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी लढा उभारा

सावंतवाडी । प्रतिनिधी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना असून या संघटनेचे विद्यार्थी ३६५ दिवस काम करीत असतात. ‘राष्ट्र प्रथम ‘ हा मंत्र जपत युवकांमध्ये राष्ट्रधर्माचे पालन करण्याची शिकवण या संघटनेच्या माध्यमातून दिली जात आहे. कारण आजचा युवक हा देशाची दशा व दिशा बदलण्याचे काम करु शकतो. २०४७ मध्ये भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचं काम हीच युवाशक्ती करेल व त्यात अभावीपचा मोलाचा वाटा राहील, असा विश्वास अभावीपच्या राष्ट्रीय मंत्री शिवांगी खरवाल यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने सावंतवाडी येथे आयोजित ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गांधी चौक येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी उपस्थित युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची चेतना जागृत केली. यावेळी प्रांत अध्यक्ष प्रा.श्रीकांत दुदगीकर,प्रांत मंत्री राहुल रजोरीआ, वैष्णव देशमुख, गौरीदेवी गुप्ता, ऋषिकेश काळे, विनय राऊत, प्रशांत नाईक, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर आदी उपस्थित होते.

ओघवत्या शैलीतील आपल्या भाषणात शिवांगी खरवाल पुढे म्हणाल्या,देशात नक्षलवादी व घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ‘ऑपरेशन पिन कोड ‘ च्या माध्यमातून हे लोक घुसखोरी करीत आहेत. त्याला रोखणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण या घुसखोरांमुळे आपले अधिकार व आपल्या सुविधा यावर गदा येत आहे. हे असेच सुरू राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील. त्यामुळे डिटेक्ट म्हणजे शोधा, डिलीट म्हणजेच त्यांचे मतदान कार्ड व अन्य सुविधा नष्ट करा व डिपोर्ट म्हणजेच त्यांना त्यांच्या देशात परत पाठवा या ‘तीन डी’ चा वापर करून आपल्या देशाला सुरक्षित करण्याचे काम माझ्यासमोर बसलेली ही प्रचंड युवाशक्ती करू शकते त्याचा मला निश्चितच विश्वास आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्याप्रमाणे आमच्या शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशात तेथील आया-बहिणीचे शोषण होत आहे ते पाहून फार दुःख होत आहे. तेथील परिवारांना हे माहीत नाही की सकाळी घरातून बाहेर पडलेली त्यांची माता बहीण किंवा मुलगी संध्याकाळी सुरक्षितपणे घरी परतेल की नाही एवढा अत्याचार त्या ठिकाणी हिंदूवर सुरू आहे. हा फार मोठा चिंतेचा विषय आहे कारण आज जर आम्ही गप्प आहोत. महिला सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या संघटना व पक्ष या विषयावर मात्र मूग गिळून गप्प आहेत. स्वामी विवेकानंद म्हणाले होते ‘उठा जागे व्हा व तोपर्यंत लढा जोपर्यंत लक्ष गाठत नाही ‘ आम्हाला जाग व्हायलाच हवं तोपर्यंत हा लाडात द्यायला हवा की जोपर्यंत बांगलादेशात शिल्लक राहिलेल्या १५ टक्के हिंदूंना न्याय मिळत नाही. आपल्या युवाशक्तीला कोणीही रोखू शकत नाही कारण अशी कोणतीही ताकद नाही की जी अभावीपची ताकद रोखू शकते, असा एल्गार त्यांनी यावेळी केला.

ज्या पद्धतीने २०१८ साली या महाराष्ट्रात ‘मिशन साहसी ‘ सारख्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यातून हे मिशन पूर्ण देशात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम करीत आहे. देशातील १५ लाख विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे या मिशनच्या माध्यमातून दिले जात आहेत. एकीकडे अभावीप सारखी संघटना अशाप्रकारे विद्यार्थी घडवत असताना तामिळनाडूतील एक नेता मात्र महिलांचे शोषण करीत आहे. तो दिवस दूर नाही की त्यांची खुर्ची अभावीप खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

स्वतःच्या भविष्यासाठी दिवसाचे आठ ते बारा तास स्वतःला खोलीत कोंडून घेऊन रात्रंदिवस अभ्यास करणारी आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला आपल्या संघटनेच्या माध्यमातून करायचे आहे. पेपर फुटीच्या घटनेवेळी सर्वात प्रथम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेच आवाज उठविला होता. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा परीक्षा घेणे भाग पडले होते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या उत्कर्षासाठी व संघर्षासाठी आपण नेहमी तत्पर राहायला हवे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या परशुरामांच्या या भूमीत येण्याचा लाभ झाला हा माझ्यासाठी सौभाग्याचा क्षण आहे. परकीय आक्रमणे होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग सारखा अभेद्य जलदुर्ग उभारला. छत्रपतींच्या आरमारामुळे आपला देश परकीय आक्रमणापासून सुरक्षित राहिला. आपल्या स्वराज्यातील व्यापार उद्योगांना चालना मिळावी यासाठी शिवरायांनी काम केले. छत्रपती शिवाजी महाराज हे मातृशक्तीला वंदन करणारे होते. त्यांचाच आदर्श घेऊन आपल्या छात्रशक्तीला राष्ट्रशक्ती बनविण्यासाठी कार्यरत होऊया असे आवाहन अभावीपच्या राष्ट्रीय मंत्री शिवांगी खरवाल यांनी केले. अभावीपच्या ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी अभाविप कोंकण प्रांत मंत्री राहुल राजोरीआ म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण प्रणाली मध्ये आमूलाग्र बदल घडत आहेत. आधीचे शिक्षण प्रणाली ही केवळ नोकर घडवणारी होती. परंतु युवा पिढी ही स्वयंरोजगार, कॉलिटी एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्या देशात नवऊर्जा निर्माण करत आहेत.

तर चिन्मयी खानोलकर म्हणाल्या की, आपले कोकण जैवविविधता, संस्कृती, साहित्य, लोककला, निसर्गाच्या माध्यमातून संपन्न आहे. परंतु आपल्या कोकणातील युवा तरुणाई नोकरीच्या, रोजगाराच्या शोधात बाहेर जात आहेत. कोकणातील तरुणांना कोकणात रोजगार मिळाव्या यासाठी पर्यावरण पूरक उद्योग कोकणात येणे गरजेचे आहे. आणि प्रकल्पांना कोकणात स्थापित करण्यासाठी कोकणातील युवकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तेव्हाच आपले समृद्ध कोकण विकसित होईल