सावंतवाडी । प्रतिनिधी : शिकारीसाठी जंगलात गेले असता चुकून चाप ओढ गेल्याने ठासणीच्या बंदुकीचा बार उडाल्यामुळे शेरे लागून पारपोली गुरववाडी येथील कृष्णा अर्जुन गुरव (वय ३५) हा तरुण गंभीर जखमी झाला. हा प्रकार २५ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास लिंगाचे वांयगण येथील जंगलात घडला. जखमीवर गोवा बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील वेदांत लक्ष्मण गुरव (२२) रविकांत वसंत गुरव ( ४०, दोघेही रा. पारपोली गुरववाडी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारपोली येथील वेदांत गुरव, कृष्णा गुरव व रविकांत गुरव हे तिघेजण २५ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरानजिकच्या लिंगाचे वांयगण या जंगलात शिकारीसाठी गेले होते. यावेळी वेदांत हातातील ठासणीची बंदुक हाताळत असतांना चाप चुकून ओढला गेल्याने बार उडून सोबत असलेल्या चुलत भाऊ कृष्णा गुरव यांच्या पोटात व पायाच्या मांडीत शेरे घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना घडताच सोबत असलेल्या वेदांत व रविकांत यांनी जखमीला तात्काळ उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचाराकरता गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले.
या घटनेनंतर गावात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पारपोली गावात जाऊन पोलीस पाटील यांच्यामार्फत चौकशी केली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी रात्रभर गावात राहून घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर वस्तुस्थिती समोर येताच मुख्य संशयित वेदांत गुरव याला पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. या कारवाई वेळी पोलीस हवालदार प्रवीण वादालकर हवालदार धुरी दीपक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राजेश नाईक आदी सहभागी होते.
त्यानंतर याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करत दुपारी यातील रविकांत गुरव यालाही ताब्यात घेण्यात आले. तर जखमी कृष्णा गुरव याला उपचारानंतर ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या वेदांत याला अटक करत दोडामार्ग येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, याबाबत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना विचारले असता यामध्ये शिकारीसाठी वापरण्यात आलेली बंदूक विनापरवाना आहे. तसेच दोन बंदुका शिकारीसाठी जाताना घेण्यात आल्या होत्या अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. सदरच्या बंदुका जप्त करण्यात येणार आहेत तसेच गोवा-बांबुळी रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके किती शेरे पोटात व मांडीत गेले हे स्पष्ट होणार असल्याचे ते म्हणाले











