महाभारतातील अपरिचित गोष्टी – समारोपाचा भाग
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा अठरावा (अखेरचा) भाग…
………….
परमार्थामध्ये नऊ या आकड्याचे फार महत्त्व आहे. या अंकाला परब्रह्माचा अंक म्हणतात. कारण नऊच्या पाढ्यातील सर्व संख्यांची बेरीज नऊच येते. उदाहरणार्थ १८ मधील एक आणि आठ यांची बेरीज नऊ होते. याउलट आठचा पाढा घेतला, तर ती बेरीज वाढते किंवा कमी होते. म्हणून आठला मायेचा अंक म्हणतात. महाभारतामध्ये एकूण १८ पर्वे आहेत. महाभारत युद्ध १८ दिवस चालले. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता अठरा अध्यायांची आहे. महाभारत युद्धामध्ये कौरव आणि पांडव यांच्या सैन्याची एकूण बेरीज १८ अक्षौहिणी इतकी होती. या सर्व कारणांमुळे महाभारतातील अपरिचित कथा या लेखमालेच्या लेखांची संख्या १८ अशी निश्चित केली गेली. या लेखमालेचा उद्देश महाभारताचे संपूर्ण ज्ञान करून देणे असा नव्हता, तर कीर्तनसंध्या उपक्रमात या वर्षी होणाऱ्या विषयासाठी श्रोत्यांची पूर्वतयारी करून घ्यावी, त्यांना महाभारतातील काही गोष्टी तरी माहिती व्हाव्यात, इतकाच मर्यादित होता.
महाभारत हा ग्रंथ केवळ श्लोकसंख्येने मोठा आहे असे नाही, तर त्यातील गोष्टींचे जितके चिंतन करावे तितके अधिकाधिक ज्ञान देणारा या अर्थानेही तो मोठा आहे. अनेक वर्षे कीर्तन-प्रवचने करूनही अशा ग्रंथाचा संपूर्ण अभ्यास होईल असे नाही. त्यामुळे हे १८ लेख वाचले म्हणजे आपल्याला सर्व कळले असे अजिबात नाही. उलट हे लेख म्हणजे महाभारतातील १८ निवडक ठिपके आहेत. ज्याप्रमाणे एखादी स्त्री अंगणात काढलेले ठिपके कुशलतेने जोडते आणि त्यात रंग भरून देखणी रांगोळी सिद्ध करते, त्याप्रमाणे या लेखमालेतील १८ ठिपक्यांमध्ये असलेले भगवद्चिंतनाचे सूत्र आपण सर्वांनी जोडावे, त्यात नवरसांचे रंग भरावेत, भगवद्भक्तीचा केशरी रंग त्यात सढळ हस्ते घ्यावा आणि आपल्या आयुष्याचीच एक देखणी रांगोळी तयार करावी. अर्थात ही रांगोळी पतितपावन लक्ष्मीनारायणा समोर काढून, ती त्यांनाच अर्पण करावयाची आहे. आपल्या सर्व संतांनी आपल्या रचनेचे श्रेय श्री भगवंतांनाच दिले आहे. आपणही तोच भाव मनामध्ये ठेवून श्री भगवंतांना अनन्यभावाने शरण जाऊन ही सर्व १८ पद्मे (कमळे) त्या परमात्म्यांच्या श्री चरणांवर समर्पित करू या. कीर्तनसंध्या परिवाराने लेखनाची ही संधी मला दिली, त्याबद्दल मी त्या सर्वांविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्व जाणकार वाचकांनी विविध माध्यमांतून आलेले हे लेख वाचलेत, म्हणून आपणासही मनापासून धन्यवाद देतो आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत प्रार्थना करतो –
न्यून ते पुरते । अधिक ते सरते ।
करोनी घेयावे हे तुमते। विनवित असे।।
ही सर्व सेवा भगवान परमात्मा श्रीकृष्णांच्या चरणी मनोभावे समर्पित करतानाच कीर्तनसंध्यासारखे उपक्रम असेच नियमितपणाने घडत राहून त्यांना सद्भक्तांचा सर्व प्रकारचा उदंड प्रतिसाद लाभो, हीच श्री परमेशचरणी मनोभावे प्रार्थना करतो. ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(लेखमाला समाप्त)
महाभारतापासून काय शिकावे?
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा सतरावा भाग…
………….
भारतवर्षाने या विश्वाला अनेक ग्रंथ दिले. ऋग्वेदादी वेद, उपनिषदे, शास्त्रे यांबरोबरच रामायण, महाभारत ही महाकाव्ये ही आपल्या संस्कृतीने जगाला दिलेली अनमोल भेटच म्हणावी लागेल. काव्यदृष्टीने ही दोन्ही महाकाव्ये श्रेष्ठ आहेतच; पण त्यातील अनमोल विचाररत्नांनी या महाकाव्यांची महती अनेक पटींनी वाढली आहे. व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् या उक्तीचे रोकडे प्रत्यंतर महाभारत वाचताना येते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
म्हणऊनि महाभारती नाही ।
तें नोहे लोकी तिहीं।
येणें कारणें म्हणिपे पाहीं ।
व्यासोच्छिष्ट जगत्त्रय ।।
महाभारतात महर्षी व्यासांनी प्रत्येक गुणवैशिष्ट्याची व्यक्तिरेखा आपल्या शब्दकुंचल्याने रेखाटली आहे. या सर्व व्यक्तिरेखांमध्ये जसे सद्गुण आहेत, तसेच दुर्गुणही आहेत. कोणताही माणूस संपूर्ण चांगला किंवा पूर्णपणे वाईट असा कधीही नसतो, हेच महाभारत शिकवते. कर्णाची उदारता आपल्याला थक्क करते आणि द्रौपदी वस्त्रहरणावेळचे त्याचे वर्तन चीड आणणारे ठरते. पती आंधळा असताना आपणही आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधावी असा विचार करणारी गांधारी चुकली असेच म्हणावे लागते. आपल्या मुलांना योग्य तिथे समज देण्यात ती कमी पडली, की तीही याच मनोभूमिकेची होती? सद्गुणाचा अतिरेक म्हणजेच दुर्गुण या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्याचे प्रत्यंतर महाभारतातील व्यक्तिरेखांचा अभ्यास करताना येते. महाभारतात धर्मराज युधिष्ठिरसुद्धा अनेक वेळा चुकलेला दिसतो द्यूत खेळणे आणि त्यात स्वतःच्या पत्नीला पणाला लावणे हे कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. म्हणजेच इथे विवेकी माणूससुद्धा व्यसनामध्ये आपली सारासार विचारबुद्धी कशी हरवतो हेच दिसते. या महाभारतात परिपूर्ण असणारे एकमात्र नायक म्हणजेच भगवान श्रीकृष्ण होत.
धटासी व्हावे धट । उद्धटासी तो उद्धट ।
खटनटासी खटनट । अगत्ये करी ।।
हे समर्थवचन जणू भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रावरूनच घेतले असावे असे वाटते. आपल्या आचरणामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विचारांचा प्रभाव असावा. आपण आपली सर्व कर्मे निष्काम भावनेने त्यांना समर्पित करावीत, हेच महाभारत आपल्याला शिकवते. महाभारतामध्ये पांडवांनी प्रत्येक प्रसंगी भगवान श्रीकृष्णांना बरोबर घेतले; मात्र द्यूताच्या वेळेला त्यांनी देवांना आठवले नाही. त्याचा परिणाम आपल्याला दिसतोच. म्हणूनच आपणही प्रत्येक कर्म श्री भगवंतांना, श्री सद्गुरूंना साक्षी ठेवून करावे, हीच सद्-ग्रंथांची शिकवण आहे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे’ याचा अर्थ प्रत्येक कर्मामागे श्री भगवंतांचे जे अधिष्ठान आहे, ते पाहत जा असा होतो. आपण जी जी कर्मे करतो ती ती केवळ त्या करुणासागर भगवंतांच्या कृपेनेच सिद्धीला जातात. रत्नागिरीला होत असणारा हा कीर्तनसंध्या उपक्रमसुद्धा त्याच जगच्चालक परमेश्वराच्या करुणाकृपेनेच होतो आहे ना? प्रति वर्षी होणारी कीर्तने ऐकून आपण त्यातून काय बोध घेतला याचा विचार आपण सर्वांनीच करणे गरजेचे आहे. कीर्तन हे प्रबोधनाचे मोठे माध्यम आहे. तो केवळ करमणुकीचा, मनोरंजनाचा प्रकार नाही. म्हणूनच आपण सर्वांनी या कीर्तनसंध्येला मोठ्या संख्येने उपस्थित राहतानाच, त्या कीर्तनातून मिळालेल्या विचारसूत्रांचा पुढील काळात सखोल अभ्यास केला पाहिजे. उपस्थितीच्या संख्यात्मक वाढीबरोबर श्रोत्यांमध्ये गुणात्मक वाढही व्हावी, हीच देवर्षी नारदांच्या श्रीचरणी मी मनोभावे प्रार्थना करतो.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
अश्वत्थामा
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा सोळावा भाग…
………….
या लेखमालेतील एका लेखामध्ये आपण सप्तचिरंजीवांचा आणि महाभारताचा काय संबंध आहे याचा विचार थोडक्यात केला होता. या सप्तचिरंजीवांचे अस्तित्व नित्य आहे. म्हणजे त्यांच्या प्रवृत्ती या कायमच्याच आहेत. जसे महर्षी व्यासांसारखे परमज्ञानी जगाच्या कल्याणासाठी ते ज्ञान
बुडते हे जन देखवे ना डोळा
येतसे कळवळा म्हणोनिया
किंवा
जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांची सांगावे ।
शहाणे करोनी सोडावे ।सकळजन।।
या न्यायाने लोकांपर्यंत पोहोचवणारे महात्मे प्रत्येक युगामध्ये होतात. म्हणजेच हेच व्यासांचे चिरंजीवित्व होय. ‘माझा सख्खा भाऊ असला, तरी सत्यनिष्ठेसाठी प्रसंगी मी त्याचा विरोध पत्करीन,’ अशी निर्भीड वृत्ती म्हणजेच बिभीषणाचे चिरंजीवित्व होय. आपल्या स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांपुढे लाचारी पत्करणारे आजच्या काळातील विद्वान लोक म्हणजे कृपाचार्यांचे सद्यस्थितीतील अवतार होत. आपल्या प्रत्येक सद्गुणाचा ईशसेवेसाठी आणि ईश्वरभक्तांच्या भल्यासाठी विनियोग करणारे, पण त्याचा कोणताही गर्व न बाळगणारे खरे दास म्हणजेच महारुद्र हनुमंतांचे चिरंजीवित्व होय. शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी तितक्याच ताकदीने सांभाळणारे आणि या दोन्ही गोष्टींचा दुष्टांचे निर्दालन आणि चांगल्याचे नवनिर्माण यासाठी वापर करणारे मानव हे मात्र भगवान परशुरामांचे वारसदार होत. भगवान परशुराम हे श्रेष्ठ गुरू होते. त्यांनी ज्यांना शिकवले ते भीष्म, द्रोण, कर्ण हे महाभारत युद्धामध्ये सरळ लढाईत मारले गेले नाहीत. त्यांना कूटनीतीने मारावे लागले. आपल्याकडील ज्ञान सत्पात्री शिष्याला देऊन त्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ बनवणाऱ्या शिक्षकांमध्ये श्री परशुरामांची चिरंजीव गुरूवृत्तीच दिसते ना? सर्व ऐश्वर्य एका क्षणामध्ये श्रीभगवंतांच्या चरणी समर्पण करणारे आणि सगळ्याबरोबरच ‘स्व’चेही ‘इदं न मम’ या भावनेने समर्पण करणारे सर्व थोर दाते हे बळीराजाचे खरे वारसदारच म्हणावे लागतील.
याचप्रमाणे आत्यंतिक सूडाने पेटलेला माणूस काय करू शकतो, याचे दर्शन अश्वत्थाम्याच्या कथेतून घडते. आपल्या पित्याला एक प्रकारे फसवून मारले गेले याचा राग मनात ठेवून अश्वत्थामा वावरत होता. महाभारताचे युद्ध अठराव्या दिवशी संपले; पण अश्वत्थाम्याच्या मनातील सूडाग्नी शांत झाला नव्हता. त्याने रात्री पांडवांच्या शिबिरात घुसून निश्चिंतपणे झोपलेल्या पांडवपुत्रांची आणि अनेक वीरांची निर्घृण हत्या केली. वास्तविक, युद्धापूर्वी ठरलेल्या नियमांमध्ये हे बसणारे नव्हते; पण अश्वत्थाम्याने सारासार विवेकबुद्धी गमावली होती. याच प्रकारे जेव्हा अश्वत्थामा आणि अर्जुन यांचे युद्ध झाले. तेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग करायचे ठरवले. प्रत्युत्तरादाखल अर्जुनानेही ब्रह्मास्त्र उगारले. दोघांनी ब्रह्मास्त्र सोडले, तर काय अनर्थ होईल हे जाणून अनेक ऋषी-मुनींनी उभय वीरांना ब्रह्मास्त्र परत घेण्याची विनंती केली. अर्जुनाने त्याप्रमाणे अस्त्र मागे घेतले. अश्वत्थाम्याला ते मागे घेता येत नव्हते. म्हणून त्याने ते अस्त्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटी असलेल्या गर्भावर सोडले. म्हणजेच पांडव आणि कौरवांचा वंश पूर्णतः संपवणे यासाठीच त्याने अस्त्रप्रयोग केला. हीच वृत्ती म्हणजे अश्वत्थाम्याची चिरंजीव सूडवृत्ती होय. याचा परिणाम म्हणजे तो स्वतःच अजूनही अस्वस्थ अवस्थेत भटकत आहे, असे सांगितले जाते. थोडक्यात, सूडभावनेने कोणीच सुखी होऊ शकत नाही, हा धडा अश्वत्थामा शिकवतो. महाभारत म्हणजे केवळ लहान मुलांना सांगण्याच्या मनोरंजनात्मक कथा नव्हेत, तर त्यांचे नित्य चिंतन करून त्यातून स्व-विकास घडवून देणारे ते एक मोठे साधनच आहे. पुढील लेखांमध्ये आपण महाभारतातून काय शिकावे याचे चिंतन करू या.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
धर्मराजाचा अधिकार
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा पंधरावा भाग…
………….
यक्षाने विविध प्रकारच्या प्रश्नांच्या फैरी झाडून धर्मराजाची कसून परीक्षा घेतली. त्याने विचारलेला एक प्रश्न असा होता, ‘जिंकण्यास कठीण असलेला शत्रू कोणता?’ धर्मराजाने उत्तर दिले, ‘क्रोध हा जिंकण्यास सर्वांत कठीण शत्रू आहे.’ यक्षाने पुढील प्रश्न विचारला, ‘ज्याला अंत नाही असा रोग कोणता?’ धर्मराज उत्तरला, ‘लोभ हा अंत नसलेला रोग आहे.’ वाचकहो, आपणही आपल्या स्वानुभवाने युधिष्ठिराने योग्य उत्तरे दिली, असेच म्हणू शकाल! आपण लहानपणी मिडास राजाची गोष्ट ऐकली असेल. खूप ऐश्वर्य असूनही मिडास राजाने हात लावीन तेथे सोने असे मागितले. ही त्याची मागणी अर्थात त्याचा लोभ हा जणू मानसिक आजारच नव्हे काय? गजनीचा महम्मद याने भारताची, विशेषतः सोरटी सोमनाथाची अनेक वेळा लूट केली आणि विपुल संपत्ती गोळा केली. आपल्या अखेरच्या वेळी ती सर्व संपत्ती त्याने आपल्यासमोर मांडून ठेवायला सांगितली आणि त्याकडे पाहत पाहतच प्राण सोडला, हेही उदाहरण लोभ हा रोग आहे हे पटवणारेच आहे ना? यक्षाने विचारले, ‘साधू कोणास म्हणावे आणि दुर्जन कोणास म्हणावे?’ धर्मराजा म्हणाला, ‘जो प्राणिमात्रांवर प्रेम करतो तो साधू आणि ज्याच्या मनात कणभरही दया किंवा क्षमा नाही तो दुर्जन.’ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज याच प्रकारे साधूंचं वर्णन करताना म्हणतात,
जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा
मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त
दया करणे जे पुत्रासी तेचि दास आणि दासी
तुका म्हणे सांगू किती तेचि भगवंताच्या मूर्ती
महाभारतातील साधूची व्याख्या आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या अभंगातील साधुत्वाची लक्षणे यांच्यातील साधर्म्य आपल्या लक्षात आले असेलच.
यक्षाने आणखी एक सुंदर प्रश्न विचारला. ‘या जगातील सर्वांत मोठे आश्चर्य कोणते?’ युधिष्ठिराने त्याला तितकेच सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, ‘दररोज शेकडो प्राणी मरतात हे पाहूनदेखील मनुष्य स्वतःला अमर समजतो हेच जगातले मोठे आश्चर्य आहे.’ सर्व प्रकारच्या प्रश्नांना धर्मराजाकडून समाधानकारक उत्तरे मिळाल्यामुळे तो यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘राजा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझ्या एका भावाला जिवंत करतो. तू सांग कोणाला जिवंत करू?’ त्यावर धर्मराज म्हणाला, ‘माझ्यासाठी तू नकुलाला जिवंत कर.’ यक्षाने विचारले, ‘पुढे होणाऱ्या युद्धामध्ये खरे तर तुला भीम किंवा अर्जुन महत्त्वाचे आहेत, तरीही तू त्यांना जिवंत कर असे का नाही म्हणालास?’ त्यावर धर्मनिष्ठ युधिष्ठिर असं म्हणतो, की ‘हे यक्षा कुंतीला मी, भीम आणि अर्जुन अशी तीन मुले. त्यापैकी मी जिवंत आहे. माझी सावत्र माता माद्री हिला दोन मुले – नकुल आणि सहदेव. त्यापैकी मात्र कोणीच जिवंत नाही. माझ्या सावत्र मातेचा वंशही टिकावा, म्हणून मी भीम किंवा अर्जुनापेक्षा नकुलाला जिवंत कर असे सांगितले.’ धर्मराजाच्या या निःस्वार्थी उत्तराने यक्ष प्रकट झाला आणि म्हणाला, ‘मी यक्ष नाही तर यमधर्म आहे. मी तुझी परीक्षा घेण्यासाठीच ही लीला केली. मी तुझ्या वागण्यावर प्रसन्न आहे. आता मी तुझ्या सर्व भावंडांना जिवंत करतो.’ असे म्हणून त्याने मृतप्राय झालेल्या चारही वीरांना जिवंत केले. त्यानंतर त्याने धर्माला सांगितले, ‘तुझ्यासाठी काही वर मागून घे.’ तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणाला, ‘काम, क्रोध, लोभ यांना जिंकण्याचे सामर्थ्य मला प्राप्त व्हावे आणि दान, तप आणि सत्य या ठिकाणी माझे मन स्थिर राहावे.’ वाचकहो, विष्णुसहस्रनामावरील लेखांमध्ये भीष्माचार्यांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या धर्मराज याचा अधिकार आता आपल्या ध्यानी आला असेल. आजपुरते इतकेच!
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
यक्षप्रश्न
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा चौदावा भाग…
………….
‘यक्षप्रश्न’ हा एक सुंदर मार्गदर्शक कथाभाग महाभारतात आला आहे. बारा वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यावर पांडव काम्यकवनातून द्वैतवनात आले. एक दिवस एक ब्राह्मण पांडवांकडे आला आणि म्हणाला, ‘माझी अरणी आणि मंथा मी एका झाडाला टांगून ठेवली होती. तेथे एक हरीण आले आणि त्याने त्या झाडाला आपली शिंगे घासायला सुरुवात केली. त्या वेळी ती अरणी आणि मंथा ज्याच्यात ठेवली होती ती कापडी झोळी हरणाच्या शिंगात अडकली. हरीण तेथून पळून गेले आणि त्याच्याबरोबर माझी अरणी आणि मंथाही गेली. अग्निहोत्राच्या नियमाप्रमाणे ती अरणी आणि मंथा मिळत नाही, तोपर्यंत माझे अग्निहोत्र बंद आहे असे धरले जाईल आणि मला त्याचे प्रायश्चित्त करावे लागेल. तरी आपण त्या हरणाच्या शिंगात अडकलेली माझी झोळी मला मिळवून द्यावी.’ त्या असहाय ब्राह्मणाला मदत करण्यासाठी सर्व पांडवांनी द्वैतवनामध्ये खूप शोध घेतला; पण त्यांना ते हरीण सापडले नाही. अनेक तासांच्या भटकंतीमुळे पांडव मात्र तहानेने व्याकूळ झाले. त्यांना जवळच एक तळे दिसले. धर्मराजाने नकुलाला आज्ञा केली, की ‘जवळच्या त्या तळ्यातून सर्वांसाठी पाणी आण.’
आपल्या थोरल्या भावाच्या आज्ञेप्रमाणे नकुल पाणी आणण्यासाठी गेला. प्रथम आपण पाणी प्यावे, मग बाकी चौघांसाठी पाणी न्यावे, असा विचार करून तो पाणी पिण्यासाठी वाकला आणि ‘हे तळे माझे आहे, माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीस, तरच तुला पाणी प्यायला मिळेल,’ असा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने त्या शब्दांकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या ओंजळीने तो पाणी पिऊ लागला. ओंजळीतील पाण्याचा ओठांना स्पर्श झाला मात्र, नकुल मृतप्राय होऊन पडला. बराच वेळ झाला तरी नकुल का येत नाही असा विचार करून धर्मराजाने सहदेवाला पाठवले; पण सहदेवाचीही नकुलासारखीच अवस्था झाली. इतकेच नाही, तर नंतर अर्जुन आणि भीमसुद्धा यक्षाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृतप्राय होऊन पडले. अखेर धर्मराज युधिष्ठिर तेथे आला. आपल्या चारही भावांची अवस्था पाहून त्याला खूप दुःख झाले. थोड्या वेळाने तोही पाण्याजवळ आला. त्यालाही ‘प्रथम प्रश्नांची उत्तरे दे मगच पाणी पी,’ असे यक्षाने सांगितले. धर्मराजाने यक्षाला सांगितले, ‘तू प्रश्न विचार. मला जमेल तशी मी उत्तरे देईन.’
यानंतरचा यक्ष-युधिष्ठिर संवाद हा यक्षप्रश्न म्हणून प्रसिद्ध आहे. या प्रश्नांमधून युधिष्ठिराची बुद्धिमत्ता, नीती, धर्मशास्त्र यांचे सखोल ज्ञान आणि निःस्वार्थ बुद्धी या सगळ्याचेच सुंदर दर्शन घडते. आपल्या सदराच्या शब्दमर्यादेमुळे आपण सर्व प्रश्नांची चर्चा करू शकणार नाही; पण काही निवडक प्रश्नांचा येथे आढावा घेऊ या. ज्या जिज्ञासूंना या गोष्टींचा सखोल अभ्यास करावयाचा आहे, त्यांनी पूजनीय वरदानंद भारती अर्थात अनंतराव आठवले यांच्या यक्षप्रश्नावरील ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा. यक्षाने युधिष्ठिराला विचारले, ‘पृथ्वीपेक्षा अधिक वजनदार कोण? आकाशापेक्षा उंच काय?’ या दोन प्रश्नांना उत्तर देताना धर्मराज म्हणतो, ‘माता ही पृथ्वीपेक्षा वजनदार आहे आणि पिता हा आकाशापेक्षा उंच आहे.’ यक्षाने आणखी एक प्रश्न विचारला, ‘वाऱ्यापेक्षा अधिक वेगवान कोण?’ युधिष्ठिराने सांगितले, ‘अर्थात आपले मन हे वाऱ्यापेक्षा अधिक वेगवान आहे.’ वाचकहो, आपण भीमरूपी महारुद्रा या स्तोत्रातही मारुतीरायांचा वेग किती याचे वर्णन करताना ‘मनासी टाकिले मागे, गतीही तुळणा नसे,’ असेच म्हणतो ना? म्हणजेच मनाच्या वेगाची तुलना मारुतीरायांच्या वेगाबरोबर होते, इतके मन वेगवान आहे. यक्षप्रश्नांतील आणखी काही प्रश्नोत्तरे पुढील भागात पाहू.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
गीता आणि सहस्रनामाची अनिवार्यता
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा तेरावा भाग…
………….
श्री विष्णुसहस्रनामामध्ये काही नावांची पुनरावृत्ती झालेली दिसते; पण प्रत्येक ठिकाणी ते नाम एकाच अर्थाने आलेले नाही. म्हणून एकदाच आलेले नामही अनेक वेळा आले असे धरावे लागते. उदाहरणार्थ, केशव हे नाम सहस्रनामात २३वे आणि ६४८वे आहे. एके ठिकाणी केशवचा अर्थ सुंदर केस असणारा असा आहे, तर दुसऱ्या ठिकाणी त्याचा अर्थ केशी नावाच्या दैत्याचा वध करणारा असा आहे. अर्थात दोन वेळा आलेले केशव हे एकच नाम नसून, दोन नावे आहेत. याचप्रमाणे माधव हे नामही तीन वेळा आले आहे. त्याचेही तीन भिन्न अर्थ होतात. संध्येतील २४ नावे श्री विष्णुसहस्रनामात आली आहेत. या सहस्रनामात भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राशी संबंधित काही नामे आली आहेत. जसे, दामोदर म्हणजे यशोदेने ज्याला दाव्याने बांधले आहे तो, शिखंडी म्हणजे ज्याने आपल्या मुकुटात मोरपीस धारण केले आहे तो, यमुनेच्या तीरावर राहणाऱ्यांना यामुन असे म्हणतात. त्यातील सर्वश्रेष्ठ म्हणून श्रीकृष्णांना सुयामुन असे नाव प्राप्त झाले आहे. त्यांनी गोवर्धन पर्वत धारण केला म्हणून त्यांना महाद्रिध्रुक असे नाव प्राप्त झाले आहे. हे नाव भगवान श्रीकृष्णांप्रमाणेच श्री विष्णूंच्या कूर्मावतारालाही लागू पडते.
भगवान श्रीकृष्णांप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्र, भगवान परशुराम यांसारख्या अवतारांचाही या सहस्रनामात संदर्भ मिळतो. राम हे श्री विष्णुसहस्रनामातील ३९४ क्रमांकाचे नाव आहे. यावर भाष्य करताना विनोबा भावे म्हणतात, की तीन, नऊ आणि चार या संख्यांची बेरीज १६ होते आणि १६तील दोन्ही अंकांची बेरीज सात होते. प्रभू श्रीरामचंद्र हे दशावतारातील सातवे अवतार आहेत, हेच जणू यातून व्यक्त झाले आहे. वाचकहो, यावरून विनोबाजी या स्तोत्राचे किती बारकाईने चिंतन करत होते, हे आपल्या ध्यानी येते. या स्तोत्रामध्ये न्यग्रोध म्हणजे वड, उंबर म्हणजे औदुंबर आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळ या वृक्षांचाही उल्लेख आलेला आढळतो.
या सहस्रनामांमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या विविध आयुधांचेही उल्लेख येतात. जसे, पांचजन्य शंख, सुदर्शनचक्र, नंदकी नावाची तलवार, शारंग नावाचे धनुष्य आणि हातात रथाचे चाक घेऊन धावून आले म्हणून रथांगपाणि. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी श्री विष्णुसहस्रनामाला माणसांमधील भक्ती विकसित करणारा भक्तिकोश म्हटले आहे. या विष्णुसहस्रनामाच्या पठणाने अनेक लाभ होतात. म्हणून हे स्तोत्र रोज म्हणणारे लाखो भक्त आपल्याला आढळतात. आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यांत जो कोणी रोज बारा वेळा विष्णुसहस्रनामाचा पाठ करतो, त्याला विष्णुयाग केल्याचे पुण्य मिळते, असे परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे सांगत असत.
थोडक्यात, माणसाचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण करणारे उत्तम साधन म्हणजे हे विष्णुसहस्रनाम स्तोत्र होय. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी आपल्या भाष्यग्रंथाच्या प्रारंभी श्री विष्णुसहस्रनामावर भाष्य केले. इतकेच नाही, तर आपल्या ‘भजगोविंदम्’ या प्रसिद्ध रचनेत त्यांनी ‘गेयम् गीता नाम सहस्रकम्’ अशा शब्दात गीता आणि सहस्रनामाची अनिवार्यता अधोरेखित केली आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांनी रोज कोणती स्तोत्रे/ सूक्ते म्हटली पाहिजेत ते सांगितले आहे आणि त्यात श्रीमद्भगवद्गीता आणि श्री विष्णुसहस्रनामाचा आवर्जून उल्लेख केला आहे. म्हणूनच आपणही या दोन्ही रचनांचा नित्य पाठ करण्याचा संकल्प करू या!
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो: भगवन्नमस्ते।।
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
श्री विष्णुसहस्रनाम
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा बारावा भाग…
………….
एक दिवस भगवान श्रीकृष्ण ध्यानमग्न अवस्थेमध्ये बसले होते. प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण कोणाचे ध्यान करतात याचे धर्मराजाला नवल वाटले आणि त्याने देवांना प्रश्न विचारला, की ‘देवा आपण कुणाचे ध्यान करत आहात.’ त्यावर पार्थसारथी भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले, ‘शरशय्येवर पडलेले भीष्म, जे या वेळी विझू पाहणाऱ्या अग्नीसारखे होत आहेत, ते माझे ध्यान करीत आहेत. म्हणून माझे मनही त्यांच्याकडे लागले आहे.’ महाभारताच्या शांतिपर्वाच्या ४६व्या अध्यायात हा कथाभाग आला आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ‘हे धर्मराजा, पुरुष सिंह भीष्म आपल्या कर्मानुसार स्वर्गलोकाला निघून जातील, तेव्हा ही पृथ्वी चंद्रहीन रात्रीप्रमाणे श्रीहीन होईल; म्हणून हे धर्मराजा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, यज्ञादिकर्मे, चारही आश्रमांचे कर्तव्यधर्म, राजधर्म यांबद्दल पितामहांकडून जाणून घे.’ श्री भगवंतांच्या या आज्ञेप्रमाणे सर्व पांडव द्रौपदीसह भीष्मांजवळ गेले. स्वतः भगवान श्रीकृष्णही या प्रसंगी उपस्थित होते. भगवंतांनी भीष्माचार्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले –
मनुष्येषु मनुष्येंद्र न दृष्टो न च मे श्रुतः।
भवतो वा गुणैर्युक्त: पृथिव्यां पुरुष: क्वचित्।। (महाभारत शांतिपर्व ५०.२८)
अर्थात, मनुष्यांमध्ये तुझ्यासमान गुणांनी युक्त पुरुष या जगात मी पाहिला नाही आणि ऐकलाही नाही. पितामह भीष्मांनी भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली आणि मान उंचावून त्यांना अभिवादन केले. यानंतर भगवान श्रीकृष्णाने भीष्मांना ‘सर्व पांडवांना यथार्थ ज्ञानाचा उपदेश करावा’ अशी आज्ञा केली. त्यावर भीष्मांनी म्हटले, ‘देवा, गुरू उपस्थित असताना त्यांच्यासमोर शिष्याने उपदेश करणे योग्य आहे का?’ त्यावर देवकीनंदन श्रीकृष्णांनी भीष्मांना ‘युधिष्ठिराला तुम्हीच ज्ञान देणे योग्य’ असे सांगितले. त्यांनी आपल्या कृपेने भीष्मांना वेदनामुक्त केले आणि नंतर वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध पितामह भीष्म आणि युधिष्ठिराचा संवाद सुरू झाला. या संवादाच्या प्रारंभीच भीष्मांनी पांडवांपैकी त्यांच्याबरोबर कोणी बोलावे ते सांगितले. महाभारताच्या शांतिपर्वाच्या ५५व्या अध्यायामध्ये ८०० लोकांमध्ये भीष्मांनी घातलेल्या अटी वर्णन केल्या आहेत.
या अटी थोडक्यात अशा आहेत – ‘जो धर्मात्मा, राजश्रेष्ठ, सत्य, दान, तप अशा गुणांनी संपन्न आहे, जो सर्वांचे आदरपूर्वक आतिथ्य करतो, जो कोणत्याही कारणाने अधर्म करत नाही, धर्मावर ज्याचे आत्यंतिक प्रेम आहे आणि वेदांचे रहस्य ज्याला पूर्णपणे ठाऊक आहे, त्या पांडवाने माझ्याशी बोलावे.’ भीष्मांच्या या अटीप्रमाणे युधिष्ठिर आणि संवाद सुरू झाला. महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या १४९व्या अध्यायात श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र आले आहे. धर्मराज युधिष्ठिराने गंगापुत्र भीष्मांना सहा प्रश्न विचारले. ते असे – मनुष्यासाठी परम धर्म कोणता? कशाचा जप केला असता प्राणिमात्रांची जन्ममरणाच्या बंधनातून सुटका होते? सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणते? सर्वांचे आश्रयस्थान कोणते? कोणाची स्तुती करावी? कोणाची पूजा करावी?
या प्रश्नांच्या उत्तरादाखल भीष्म म्हणतात, ‘अशुभ कर्मांनी होणारी पापे दूर करण्यासाठी हे धर्मराजा माझ्याकडून सहस्रनाम श्रवण कर.’ त्यांनी सांगितलेल्या नामांची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणतात, ‘जी नावे गुणासंबंधी म्हणजे गुणामुळे प्रवृत्त झाली आहेत, त्यापैकी जी नावे प्रसिद्ध आहेत, ती मी तुला सांगतो.’ या सहस्रनामांमध्ये केवळ विष्णूंची नावे आहेत असे नाही, तर आदित्यादि देवांची, यज्ञाची, शंकरांची अशी अनेक नावे आली आहेत. या नावांशी जोडलेल्या काही कथाही आहेत. या सर्वांची तोंडओळख पुढील भागात करून घेऊ.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा अकरावा भाग…
………….
श्रीमद्भगवद्गीता ह्या अठरा अध्यायी ग्रंथाच्या सुरुवातीला अर्जुन आपल्या नातेवाईकांच्या मोहात पडतो आणि मी युद्ध करू शकत नाही असे देवांना सांगतो. आजपर्यंत अनेक युद्धे लढणारा हाच महायोद्धा आता मात्र युद्धाचे दुष्परिणाम काय आहेत ते सांगू लागतो. श्रीभगवंत त्याला आपल्या बोधामृताने भानावर आणतात आणि गीतेच्या अखेरीस अर्जुन श्री भगवंतांना ‘माझा मोह नष्ट झाला, कर्तव्याचे भान जागे झाले,’ असे सांगतो. थोडक्यात, श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ वाचकाला तुझे कर्तव्य काय आहे याची स्पष्ट जाणीव करून देतो. ‘आपले कर्तव्य निष्काम बुद्धीने कर’ हा कर्मयोग शिकवतो. आपण जे जे काही करतो ते सगळे श्रीभगवंतांना अर्पण करावे असा भक्तियोगही शिकवतो आणि सर्वांठायी एकमात्र परमात्मा भरला आहे ते दाखवणारा ज्ञानयोगही अनुभवायला देतो. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्ही गोष्टींचा बोध देणारा श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे भगवान श्रीकृष्णांची वाङ्मयीन मूर्तीच आहे.
या ग्रंथाचे अध्याय विविध योगांच्या नावाने ओळखले जातात. उदाहरणार्थ पहिल्या अध्यायाला अर्जुनविषादयोग असे म्हटले आहे. आता विषाद म्हणजे अत्यंत दुःख हा योग कसा होईल? पण युज् म्हणजे जोडणे यावरून योग हा शब्द बनला आहे. अर्जुनाला झालेल्या आत्यंतिक दुःखामुळे तो भगवंतांशी जोडला गेला, म्हणून त्याचा विषाद हाही त्याच्यासाठी भाग्ययोगच ठरला. म्हणूनच अध्यायाचे नामकरण झाले अर्जुनविषादयोग!
या ग्रंथामध्ये श्रीभगवंतांनी ‘योग: कर्मसु कौशलम्’ यासारखी अनेक महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली आहेत. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने आपण केलेली सर्व कर्मे ईश्वरार्पण करावीत, असे श्री भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. आधुनिक काळात मॅनेजमेंट शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीताही अभ्यासावीच लागते. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी आपल्याकडे येणाऱ्या सन्माननीय अतिथींना श्रीमद्भगवद्गीतेची प्रत आवर्जून भेट म्हणून देतात. हेच या ग्रंथाचे महत्त्व आहे. आपणही हा ग्रंथ पाठ करावा. आपल्याकडून ७०० श्लोकांचे पाठांतर होईल का, असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो. त्यासाठी एक छोटेसे उदाहरण देतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका, दूरदर्शनच्या निर्मात्या सुहासिनी मुळगावकर यांना संपूर्ण भगवद्गीता पाठ होती. एका मुलाखतीत त्यांनी गीता पाठ कशी केली ते सांगितले आहे. त्या म्हणतात, ‘मी कॉलेजला जायला लागले तेव्हा माझ्या वडिलांनी आदल्या दिवशीच्या बसच्या दोन तिकिटांच्या मागच्या बाजूवर दोन श्लोक म्हणजे प्रत्येक तिकिटावर एक श्लोक लिहून घेण्यास सांगितले. घरातून कॉलेजपर्यंत जाताना एक श्लोक पाठ कर आणि कॉलेजमधून घरी येताना दुसरा श्लोक पाठ कर, असे सांगितले.’ सुहासिनीताई सांगतात, ‘मी याप्रमाणे प्रामाणिकपणे रोज दोन श्लोक पाठ केले आणि दोन वर्षांत भगवद्गीता मला मुखोद्गत झाली.’ वाचकहो, सुहासिनीताईंना जे जमलं ते आपल्याला का नाही जमणार? ‘केल्याने होत आहे रे, आधि केलेचि पाहिजे’ या उक्तीवर दृढ विश्वास ठेवू या आणि या २०२५मध्ये भगवद्गीतेचे किमान बारावा आणि पंधरावा असे दोन अध्याय पाठ करू या. श्री भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रयत्न करणे इतकेच आपले कर्तव्य आहे, यश देणारे श्री समर्थ आहेतच!
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।।
।। गोपालकृष्ण भगवान की जय।।
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
श्रीमद्भगवद्गीता
ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या ‘महाभारतातील अपरिचित गोष्टी’ या लेखमालेचा हा दहावा भाग…
………….
महाभारताने संपूर्ण विश्वाला दोन महत्त्वाच्या देणग्या दिल्या आहेत. त्यातील एक म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. आजच्या लेखात आपण या अद्वितीय ग्रंथाची ओळख करून घेऊ या. श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचा प्रारंभ धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातील संवादाने होतो. जन्मांध असणारा राजा धृतराष्ट्र संजयाला विचारतो –
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव: ।
मामका: पांडवाश्चैव किमकुर्वत संजय ।।
हा प्रश्न विचारण्याचे कारण काय, तर युद्ध सुरू होण्याआधी धृतराष्ट्राने आपला बुद्धिमान, बोलण्यात चतुर असणारा मंत्री संजय याला पांडवांकडे त्यांची समजूत काढण्यासाठी पाठवले होते. हा भाग महाभारतात संजयशिष्टाई म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या भेटीदरम्यान संजयने धर्मराजाला हे युद्ध करणे कसे चुकीचे आहे, याने कुलक्षय होईल, अराजक माजेल असे सांगितले होते. धृतराष्ट्र आणि त्याचे सल्लागार यांचा अंदाज होता, की धर्मराजा हे ऐकून युद्ध करणे टाळेल; पण तसे झाले नाही. कौरव आणि पांडव युद्धासाठी समोरासमोर उभे राहिले. आपण केलेल्या कूटनीतीचे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी वरील प्रश्न विचारला गेला. गंमत अशी, की या संजयशिष्टाईचा प्रभाव धर्मराजावर न पडता अर्जुनावर पडला आणि हातातील धनुष्यबाण टाकून अर्जुन ‘युद्ध नको’ असे म्हणू लागला. श्रीमद्भगवद्गीतेचा हा प्रारंभीचा प्रसंग आहे.
अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या संवादातील श्लोकांची अध्यायानुसार विभागणी महर्षी व्यासांनी केली. या ग्रंथामध्ये अठरा अध्याय असून सातशे श्लोक आहेत. या ग्रंथाचा प्रभाव केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही पडलेला दिसतो. प्रख्यात शास्त्रज्ञ रॉबर्ट जे. ओपेनहायमर यांनी अणुबॉम्बची चाचणी घेतली, त्या वेळी झालेल्या स्फोटाचा प्रकाश पाहून त्यांच्या मुखातून अकराव्या अध्यायातील ‘दिवि सूर्य सहस्रस्य…’ हा श्लोक बाहेर पडला. याच शास्त्रज्ञाने राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या शोकसभेतील आपल्या भाषणाची सुरुवात ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु:’ या श्लोकाने केली. म्हणजेच ओपेनहायमर याची संपूर्ण भगवद्गीता अर्थासह पाठ होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, योगी अरविंद यांच्यासारख्या लोकनेत्यांवरही श्रीमद्भगवद्गीतेचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो.
श्रीमद्भगवद्गीता तीन जणांनी ऐकली. त्यावरून तीन प्रकारचे श्रोतेच समोर येतात. पहिला श्रोता अर्जुन, ज्याने भगवंतांचा उपदेश श्रवण करून तत्काळ आचरणात आणला. दुसरा श्रोता संजय. महर्षी व्यासांच्या कृपेने त्याला या ग्रंथाचे दूर श्रवण करता आले. त्याने ते ऐकले, त्याचा आनंद घेतला; पण ते धृतराष्ट्राला सांगितल्यानंतर स्वतःत काही बदल केले नाहीत. आपण एखादी गोष्ट ऐकतो, त्याचा दुसऱ्याला उपदेश करतो; पण स्वतः काही करायचे आहे हे मात्र विसरतो, हा श्रोत्यातील दुसरा प्रकार होय. राजा धृतराष्ट्राने संजयाकडून गीता श्रवण केली; पण त्याचा काडीमात्र परिणाम त्याच्यावर दिसला नाही. श्रोत्यांमधील हा तिसरा नमुना होय. आपण सद्-ग्रंथ कसा ऐकावा याचा विचार ज्याचा त्याने करावा हेचि भले. धृतराष्ट्राने गीता ऐकल्यानंतरही त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. म्हणजे ते श्रवण फुकट गेले का? तर तसे नाही. महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला. त्या वेळी जंगलाला लागलेल्या आगीमध्ये धृतराष्ट्राचा मृत्यू झाला. त्या प्रसंगी स्थितप्रज्ञाप्रमाणे ध्यान लावून तो मृत्यूला सहज सामोरा गेला. यावरून गीतेचा त्याच्यावरही प्रभाव पडला असे दिसते.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)










