स्व.यशवंत म्हणजे माझी सावली होती- रमेश शिर्के

शोकसभेत त्यांच्या आठवणीला दिला उजाळा

चिपळूण: कोणी म्हणते यशवंत माझा समर्थक होता. कोणी म्हणतो माझा छोटा भाऊ होता. तर कोणी म्हणत तो पाठीराखा होता. खरं पाहिले तर मला नेहमी असंच वाटते माझा यशवंत म्हणजे माझी सावली होती, परंतु ही सावली आज माझ्यापासून कायमची दूर गेली असून खऱ्या अर्थाने कर्तुत्वाचा दीपस्तंभच यशवंत होता असे मत चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के यांनी शोकसभेमध्ये व्यक्त केले.

आदर्श विद्यामंदिर चिवेली येथे शालेय समितीचे चेअरमन स्वर्गीय यशवंत महादेव शिर्के यांचा शोकसभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के, सल्लागार रघुनाथ शिर्के, अशोक वनगे, मोहन शिर्के, व्हा. चेअरमन संतोष कुळे, बामनोली सरपंच सुदेश गमरे, बाबुराव डिंगणकर, संतोष गोरिवले, दत्तराम फावरे, महादेव पवार, मुख्याध्यापक संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे रमेश शिर्के म्हणाले की यशवंत शिर्के यांचे चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ आणि आदर्श विद्यामंदिर चिवेली मध्ये अनमोल असे योगदान आहे. त्यांनी गेली 40 वर्ष स्वतःचे आयुष्य या शैक्षणिक कामासाठी वाहून घेतले होते. माझ्यापेक्षा तो तीन वर्षांनी लहान होता. मात्र नेहमीच मी जे स्वप्न पाहणार ते तो पूर्ण करण्यासाठी धडपडत असायचा. नवीन इमारत बांधण्याच्या वेळी तो नेहमीच काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत असे.
यशवंत म्हणजे कर्तुत्वाचा दीपस्तंभ होता. त्याला धार्मिक सामाजिक, शैक्षणिक आणि गावच्या विकास कार्याची मोठी आवड होती. पाच देवळी वरील पाच देवींच्या पालखी भेट करण्याचे त्याचे स्वप्न होते. ते मात्र राहिले आहे. शाळेसाठी त्यांनी नेहमीच आपल्या मुलांचे संगोपन करावे असेच लक्ष देत सर्व समस्या सोडवण्यासाठी तत्पर प्रयत्न केले आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आम्हाला सोडून गेल्याने निश्चितच एक पोकळी निर्माण झालेली आहे. तो आमचा आधारवड होत असे उदगार शेवटी त्यांनी काढले.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के यांनी सुद्धा त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. अनेक मान्यवरांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणी काढत त्यांनी केलेल्या कामावरती प्रकाश टाकला. सौ. संजना कानसेने सुद्धा त्यांच्या आठवणी सांगताना अतिशय भावूक झाल्या. सर्वांच्याच डोळ्यातून यावेळी पाणी वाहू लागले. असे यशवंत शिर्के म्हणजेच सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व होते.

या कार्यक्रमाला विद्यार्थी वर्ग ग्रामस्थ सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते . सर्वांनी यशवंत शिर्के यांच्या आठवणीने दुःख व्यक्त केले व त्यांचा संपूर्ण परिवार सुद्धा उपस्थित होत्या शेवटी यशवंत शिर्के यांचे चिरंजीव मंगेश शिर्के यांनी सुद्धा या शोकसभेबद्दल आणि त्यांच्या अंत्यविधीला आलेला सर्वांचेच मनापासून आभार मानताना सांगितले की, आमच्या वडिलांचा जो वसा आहे तो असाच आम्ही असंच पुढे चालू ठेवू. यावेळी त्यांनी दुखावट्याला जमलेली 25 हजार रक्कम ही आदर्श विद्यामंदिर शाळेसाठी देऊन एक मोठे सत्कर्म केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गुरव यांनी केले.