चिवेली बावळेचा माळ येथे २६ रोजी रंगणार चिवेली बामणोली ग्रामदेवतेची त्रैवार्षिक भेट

चिपळूण (वार्ताहर ) : तालुक्यातील श्री वाघेश्वरी ग्रामदेवता चिवेली आणि बामनोली येथील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता व वाघेश्वरी ग्रामदेवता बामणोली या तीन ग्रामदेवतेचा त्रैवार्षिक पालखी भेट सोहळा दिनांक 26 मार्च रोजी चिवेली बावळेचा माळ येथे होणार आहे. तीन वर्षांनी होणाऱ्या या शिमगा उत्सवातील भेटीला भावीकांची अलोट गर्दी होत असते.

तीन वर्षांनी हा पालखी भेट सोहळा होत असल्याने या ठिकाणी मुंबई सह आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात. चिवेली येथील वाघेश्वरी माता ही मोठी बहीण असल्याने या बहिणीला तीन वर्षांनी बामनोली मधील तिच्या बहिणी भेटीला जातात. चिवेली बावलेचा माळ येठे मंगळवार २६ रोजी सायंकाळी ४ वाजता हा नेत्रदीपक सोहळा होणार आहे. दुपारी वाजत गाजत पालख्यांचे आगमन बावळेचा माळ येथे होईल. प्रत्येक पालखीसाठी रिंगण आखले जाते. त्या रिंगणातच पालख्या दाखल होतील. त्यानंतर पहिल्यांदा चिवेली ग्रामदेवता बामणोली वाघेश्र्वरी देवीला भेटेल. नंतर श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता बामणोली चिवेली ग्रामदेवतेला भेटेल. असा नेत्रदीपक सोहळा होईल. त्यानंतर भाविकांना देवींचे दर्शन घेण्यास सुरुवात होईल.

या ठिकाणी ग्रामदेवतेच्या खेळी मंडळी थाप मारतील. त्यातून देवीची आळवणी केली जाते. शेवटी परतीचा प्रवास करताना पुन्हा गळा भेट होते आणि ग्रामदेवता आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होतात. बामणोली आणि चिवेली गावचे ग्रामस्थ मिळून या सोहळ्याचे नियोजन करतात. चाकरमानी सुध्दा या सोहळ्यास उपस्थित राहतात.