सामाजिक क्रांती घडविणाऱ्या कविता समाजाला दिशादर्शक ठरतील : डॉ. संजीव लिंगवत 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :दिवसेंदिवस समाजात पर्यावरण समस्या निर्माण होत असुन तरूण व शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, महागाईचा बकासुर, मोबाईलचा दुरुपयोग, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा , माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वाढत आहेत. या बाबतीत समाजासमोर आलेल्या सामाजिक क्रांती घडविणाऱ्या कविता समाजाला दिशादर्शक ठरतील व तरुणांमध्ये मानसिक बदल घडवू शकतील असे प्रतिपादन वेंगुर्ले येथील डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.

कोकण मराठी परिषद, गोवा तर्फे म्हापसा येथे आयोजित विसाव्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या निमंत्रितांचे बहुभाषिक कवी संमेलन या सत्रात ‘काव्यहोत्र’ या शीर्षकाखाली कविवर्य कै. अशोक बोरकर यांना समर्पित कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ. संजीव लिंगवत बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कवी संमेलन सत्राचे समन्वयक अशोक घाडी, विशेष निमंत्रित डॉ. आरती दिनकर, कवीयीत्री सुवर्णा गुंड चव्हाण, सत्र प्रमुख सुनिता शाह व सुभाष शाह उपस्थित होते.

यावेळी सुभाष शहा, सुनिता शहा, मुरलीधर बर्डे , यशवंत परवार सत्यवान पेडणेकर, सुरेंद्र शेट्ये ,मेघा जाधव, मुकुंद मळगावकर, प्रमोद कारापुरकर, संदिप केळकर , पुष्पा गायतोंडे, शोभा धाम्सकर ,प्रांचल चौधरी ,जितेंद्र फडते ,अशोक लोटलीकर , पांडुरंग कुलकर्णी धनश्री जाधव यांनी हिंदी , मराठी , कोकणी , मालवणी आदी विविध भाषेतील कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे स्वागत , आभार प्रदर्शन कोकण मराठी परिषदचे अध्यक्ष सुदेश आर्लेकर यांनी केले तर सुत्रसंचलन संमेलनाच्या कार्यवाह अक्षता किनळेकर यांनी केले.