ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम सुरू असल्याच्या तक्रारी
राजापूर (वार्ताहर): राजापूर वासियांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिर आणि परिसराच्या सुशोभिकरणाच्या कामात अनेक त्रृटी असून ग्रामस्थांना विश्वासात न घेता सदरचे काम सुरू असल्याच्या तक्रारी येथील ग्रामस्थांनी आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्याकडे केल्यानंतर सदरचे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना आ.सामंत यांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेवून कामाचे नियोजन करण्यात येईल असेही आ.सामंत यांनी यावेळी सांगितले.
प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमाअंतर्गत श्री देव धूतपापेश्वर मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी शासनाने 11 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तीन विभागात कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यामध्ये मंदिराचा जीर्णोध्दार व पुर्नबांधकाम करणे, मंदिर परिसराचा जीर्णोध्दार व संवर्धन करण्यात येणार आहे. या कामामध्ये धुतपापेश्वर मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर भाविकांसाठी आवश्यक दुकान गाळ्यांची बांधणी करणे, मृडानी नदीवरील पुलाचे विद्युतीकरण व सुशोभिकरण करणे, पर्यटक व भाविकांच्या दृष्टीने परिसर विकास, विश्रामगृह तसेच प्रसाधनगृहाची दुरूस्ती, दत्त मंदिराच्या दर्शनी भागाचे सुशोभिकरण, मंदिर परिसरातील सिमेंट ब्लॉक परसबंदी काढून कातळ दगडात परसबंदी, मंदिराच्या प्रवेशद्वारापुढील मार्गाच्या सिमेंट ब्लॉक काढून जांभ्या दगडात परसबंदी करणे आदी कामे करण्यात येत आहे.
दरम्यान श्री धूतपापेश्वर मंदिर आणि परिसर सुशोभिकरणाचे निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र हे काम होत असताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तकारी सुरूवातीपासून होत होत्या. शिवाय या कामात अनेक त्रृटी असल्याचे देखील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी धोपेश्वर ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या आमदार किरण सामंत यांनी श्री धूतपापेश्वर मंदिरात जात दर्शन घेतले तसेच मंदिराच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी मंदिर सुशोभिकरण कामामध्ये असलेल्या त्रृटी आ.सामंत यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
त्यामुळे आ.सामंत यांनी सदरचे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना देत लवकरच प्रशासकीय अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेवून कामाचे नियोजन करण्यात येईल, असेही आ.सामंत यांनी ग्रामस्थांना आश्वासीत केले. यावेळी शिवसेना तालुकापमुख दिपक नागले, जिल्हा संघटक पकाश कुवळेकर, धोपेश्वर सरपंच गणेश पाष्टे, उपसरपंच नरेश सूद, सदस्य उमेश शिवगण, शिवसेना शहरपमुख सौरभ खडपे, सागर खडपे, संतोष लिंगायत, पकाश नाडणकर, सौरभ मसुरकर, गौरव शिंदे, जितेंद्र तुळसावडेकर, पसाद गुरव यांच्यासह धोपेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते.












