मंत्री पदाचा प्रत्येक दिवस जनसेवेसाठी – मंत्री नितेश राणे

नाधवडेत एमआयडीसी उभारणार : तरुणांना रोजगार देणार

विकासासाठी एकत्र या : विरोधकांना ना. नितेश राणे यांचे आवाहन

राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांचा वैभववाडीत नागरी सत्कार

वैभववाडी प्रतिनिधी :
मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहे. नाधवडे येथे लवकरच एमआयडीसी उभारणार. त्याचबरोबर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहे. मंत्रीपदाचा प्रत्येक दिवस हा निस्वार्थीपणे काम करून जनतेची सेवा करणार. आता मी एकटा मंत्री नसून तुम्ही सर्व मंत्री झाला आहात, असे प्रतिपादन नामदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे व्यक्त केले. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अडीच वर्षात विकासासाठी खूप निधी दिला असेही त्यांनी सांगितले. यापुढे विकासात राजकीय विरोधकांनी आडवे येऊ नये, विकासाला साथ द्यावी. विकासात त्यांना बरोबर घेतले जाईल असेही सांगितले.

वैभववाडी भाजपच्या वतीने राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी विविध समाज संघटना, संस्था, मंडळे भाजपाच्या विविध मोर्चा, संघटना, शासकीय संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, यांनीही मंत्री नितेश राणे यांचा सत्कार केला. यावेळी वैभववाडी भाजपा पदाधिकारी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मंत्री नितेश राणे म्हणाले, वैभववाडी वासियांनी माझ्यावर दहा वर्ष मनापासून प्रेम केले. वैभववाडीचे प्रेम मी कधीही विसरणार नाही. तुमचे किती आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. 2014 व 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत आपण माझ्यासोबत राहीलात, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत काम केले. सत्तेत नसलो तरी मतदारसंघातील प्रत्येकाला नितेश राणे न्याय देणार असा विश्वास तुमचा होता. यापुढे मंत्रीपदाचा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठीच, निस्वार्थीपणे तुमची सेवा करेन असे नितेश राणे यांनी सांगितले.

अधिकारी यांनी यापुढे पारदर्शक व निष्ठेने काम केलेच पाहिजे. कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. तक्रार आल्यास अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे. यापुढे देखील मला तुमच्या सोबत प्रवास करायचा आहे. आता तुम्ही सर्व मंत्री झाला आहात. तुमच्या मंत्र्याचा दरारा एकदा मंत्रालयात आल्यावर दिसेलच. यापुढे मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी वैभववाडीकरांना रांगेत उभे राहायला लागणार नाही. कारण वैभववाडी माझे हृदय आहे. या भागाचा मला यापुढेही विकास करायचा आहे. विकास कामात कोणती तोडजोड केली जाणार नाही. हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. प्रशासन व अधिकारी यांनी कार्यकर्त्यांना त्रास देण्याच्या प्रयत्न करू नये. आता 85 टक्के वैभववाडी भाजपामय झाली आहे. काही औषधालाच शिल्लक राहिले आहेत. ते देखील लवकरच भाजपात येतील. जास्तीत जास्त निधी वैभववाडीला देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. प्रलंबित सर्व प्रश्न मी मार्गी लावणार आहे. हे सर्व करत असताना दोघातील संवाद महत्त्वाचा आहे. पहिलं जसं फोन करत होता, तसाच तुम्ही फोन करा. मंत्री असलो तरी संपर्कात राहुया, रवींद्र चव्हाण यांचेही मंत्री नितेश राणे यांनी आभार मानले. अडीच वर्षात मतदार संघाला भरघोस निधी रवींद्र चव्हाण यांनी दिला. राजकीय विरोधकांनी सबुरीने घेण्याचा त्यांनी सल्ला दिला. विकासात उगाच आडवे येण्याचा कुणी प्रयत्न करू नये. विकासात आडवे येणाऱ्याला सरळ केलं जाईल असा दम ही नितेश राणे यांनी दिला.

यावेळी विविध संघटना, पदाधिकारी, संस्था, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. वैभववाडी भाजपच्या वतीने चांदीची तलवार भेट देऊन मंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, प्राची तावडे, नेहा माईंणकर, शारदा कांबळे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष टक्के, संजय रावराणे यांनी केले. यावेळी प्रत्येक गावच्या वतीने मंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध समाज बांधव यांनी देखील नितेश राणे यांचा सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्येने वैभववाडीतील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.