एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली

Gold ornaments and cash of a woman traveling in ST bus were stolen

लांजा साटवली इसवली बस मधील घटना

घटनेत चोरीला गेलेला मुद्देमाल एक लाख ७४ हजार रुपयांचा

लांजा (प्रतिनिधी) गर्दीचा फायदा घेऊन लांजा ते साटवली असा एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम १५००० असा एकूण १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना लांजा साटवली इसवली या एसटी बस मध्ये घडली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी १२ मे रोजी पत्रकारांना दिली.

सौ. गीता गजानन बाणे (वय ५२ राहणार साटवली लागणवाडी, सध्या राहणार जय हनुमान सोसायटी ए विंग पहिला माळा रूम नंबर १०२ कुराळ विलेज मालाड मुंबई) या दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सुटणाऱ्या लांजा साटवली इसवली बस मधून साटवलीकडे जात होत्या. त्यांच्या सोबत त्यांचे पती देखील होते. लांजा ते साटवली हायस्कूल स्टॉप असा एसटी प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या काखेतील पर्समध्ये पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने यामध्ये १ लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच ५० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचा हार, ७ हजार रुपये किमतीचा पाच ग्रॅम वजनाची पुरुषांची अंगठी ,दोन हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची नथ आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

बस मध्ये असलेल्या गर्दीचा फायदा उठवून चोरट्याने ही चोरी केली आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दिनांक १० मे रोजी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी पाटील या करत आहेत.