विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकारांना दिल्या शुभेच्छा.
मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दि. 6 जानेवारी 2025 रोजी पत्रकार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
निर्भीड,निष्पक्ष पत्रकारितेतून समाज प्रबोधन करणारे पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरूवात 6 जानेवारी 1832 रोजी केली. याचे स्मरण म्हणून दि. 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून मंडणगड तालुका पत्रकार संघाने विविध कार्यक्रम आयोजित केले. प्रथम पत्रकार संघाच्या कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्याविषयी व पत्रकारितेचे महत्व याविषयी उपस्थित पत्रकारांनी मनोगते व्यक्त केली.
यानंतर भिंगळोली येथील ग्रामिण रूग्णालय येथे रूग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून तहसीलदार अक्षय ढाकणे, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राकेश साळुंखे, डॉ.प्रभाकर भावठाणकर, पोलीस हवालदार धनंजय सावंत, कुंबळे गावचे माजी सरपंच किशोर दळवी, मंडणगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पवार, पुढारीचे पत्रकार विनोद पवार, दैनिक रत्नागिरी टाईम्सचे पत्रकार अँड दयानंद कांबळे, दैनिक लोकमतचे पत्रकार प्रशांत सुर्वे, दैनिक सकाळचे पत्रकार सचिन माळी, दैनिक तरुण भारतचे पत्रकार विजय जोशी, दै.सुर्योदयचे भरत सरफरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तालुक्यातील पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.












