सुप्रसिद्ध अभिनेते महेश कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती
लांजा(प्रतिनिधी) सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये नावलौकिकता मिळवायची असेल, टिकून रहायचे असेल तर कोणताही न्यूनगंड न बाळगता आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात विध्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि जिद्द कायम राखल्यास यशाला सहज गवसणी घालता येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते महेश कोकाटे यांनी तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे केले.
तालुक्यातील श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक येथे वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी पार पडला . याप्रसंगी अभिनेते महेश कोकाटे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या सोहळ्या प्रसंगी राजापूर-लांजा-साखरपा चे आमदार किरण सामंत, वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष मारुती डोळस, रोहिणी डोळस, कार्याध्यक्ष सुभाष राणे, सचिव संतोष पडवणकर, सिने-नाट्य अभिनेते अमोल रेडीज, मनीष कोकाटे, संचालक शैलेश डोळस, रवींद्र डोळस, सुरेश चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक अरुण डोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महेश कोकाटे बोलताना म्हणाले की, माझे मुळ गाव कोकणातील वेरवली असून मी पण ग्रामीण भागातूनच मुंबईत गेलो माझी आवड असणाऱ्या अभिनय क्षेत्रात जिद्दीने प्रयत्न, अनेक वर्षे स्ट्रगल करत राहिलो आणि त्यामुळेच अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली. काही वर्षांपूर्वीचे वेरवली गाव विकासात्मक सुविधां गोष्टीनी प्रगतीच्या दिशेने गेले आहे हे पाहून समाधान वाटते आहे. मी जरी मुंबई सारख्या शहरात असलो तरी माझे ऋणानुबंध माझ्या गावाशी जोडले आहेत अशा भावना अभिनेते महेश कोकाटे यांनी व्यक्त केल्या.
आमदार किरण सामंत यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सांगितले की, वेरवली शिक्षण संसंस्थेचे काम आदर्शवत सुरू आहे. वेरवली शिक्षण संस्थेच्या प्रत्येक उपक्रमासाठी शालेय सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक विभाग उंचावण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास दिला. यावेळी किरण सामंत यांचा वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरण आमदार किरण सामंत व महेश कोकाटे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अभिनेते महेश कोकाटे यांना आ. किरण सामंत यांच्या हस्ते स्व. रमेश धोंडू डोळस कला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुभाष लाड, साक्षी पडवणकर, आबा सुर्वे, प्रविण कांबळे, विजय हटकर, सुभाष बोडस, शिवाप्पा उकली, तेजस्विनी आचरेकर, भाई जोशी, महिलाश्रम लांजा यांना अभिनेते महेश कोकाटे यांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवन, स्वागतगीत, दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला लांजा न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंतभाऊ शेट्ये, माजी मुख्याध्यापक विजय बेर्डे, विद्या बेलवलकर, लांजाच्या माजी नगराध्यक्षा संपदा वाघधरे, जयवंत जाधव, सुरज कुडतडकर, पंढरी गुरव यांसह वेरवली पंचक्रोशीमधील नागरिक, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल रेडीज यांनी सूत्रसंचलन विनोद बंडगर, सचिन कांबळे तर आभार मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी मानले.












