लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. सत्तास्थापनही झाली. राज्यकारभाराचा गाडाही सुरू झाला. सत्ताधारी काय करणार याकडे जनतेचे अपेक्षेने डोळे लागले आहेत. विरोधक काय बोलतात आणि टीका कोणती करतात, याकडे फारसे लक्ष देण्याची आता गरज नाही. याचे कारण, आतापर्यंत फक्त विरोध होत राहिला.
यामुळे कोकणात रोजगाराच्या कोणत्याही संधी निर्माणच होऊ शकल्या नाहीत. परिणामी, कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही, नव्हे तर प्रकल्प येऊ दिला नाही. यामुळे, सहाजिकच कोकणात पदवी, इंजिनिअरिंग आदी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या तरुणांची बेकारी कमालीची वाढली. कोकणात कोणताही प्रकल्प केवळ विरोधामुळे उभा राहू शकला नाही.
कोकणातील तरुण रोजगारासाठी सिंधुदुर्ग जवळच्या गोवा राज्यात जातो. रायगड आणि रत्नागिरीतील तरुण मुंबईत पोटापाण्यासाठी धडपड करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यांतील तरुण गोवा राज्यात नोकरी करत आहेत. गोवा राज्यातील खाजगी बँकांमध्ये कोकणातील तरुणांचा मोठा भरणा आहे. औषध कंपन्या, प्रिंटींग प्रेस, आणि इतर खाजगी उद्योगांमध्ये ८०% पेक्षा अधिक सिंधुदुर्गातील तरुण कार्यरत आहेत.
वृत्तपत्र क्षेत्रातील एका संपादक मित्राने सांगितले, की सिंधुदुर्गातील प्रिंटींग प्रेसमधील तरुणांनी ठरवल्यास गोव्यात एकाही वृत्तपत्राची छपाई होणार नाही. गोवा राज्यातील बँकांची स्थितीही वेगळी नाही. सातार्डे ब्रिज शेजारी उभ्या असलेल्या हजारो मोटरसायकल पाहून लक्षात येईल, की गोवा राज्यात किती हजार तरुण काम करत आहेत.
अनेक तरुण अनिच्छेने मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत आहेत. कोकणातील ग्रामीण भागातील अनेक घरे बंद आहेत. याचे एकच कारण आहे – रोजगाराची संधी उपलब्ध नाही. कोकणातील तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध झाला, तर बाहेर जाण्याची त्यांची मानसिकताच नाही.
म्हणून कोकणात नवनवीन प्रकल्प येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. उद्योगांची उभारणी झाली पाहिजे. कोणताही प्रकल्प कोकणात येतो म्हटले, तरी त्याला विरोध ठरलेलाच आहे. विरोध करणाऱ्यांना राजकारण करायचे असते. त्यांना कोकणातील जनतेचे भले-बुरे काही समजून घ्यायचे नसते.
विरोध करणारे हे करतच राहतील, पण विरोधक विचारी झाले नाहीत तरी चालेल. मात्र, कोकणातील जनतेने विचारपूर्वक भूमिका घेतली पाहिजे. सकारात्मक विचार करून कोकणात प्रकल्प यायला हवेत. पर्यटन व्यवसायातून रोजगाराची निर्मिती होईलच, पण उद्योगांची उभारणीही महत्त्वाची आहे.
लाख-दोन लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणारे प्रकल्प उभारले गेले पाहिजेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे शक्य आहे. पर्यटन व्यवसायालाही मर्यादा आहेत, याचा विचार करून उद्योगांच्या उभारणीला प्राधान्य दिले पाहिजे.
जनतेने उद्योगांसाठी आणि प्रकल्पांसाठी आग्रही राहिले पाहिजे. विरोधाच्या काळ्या झेंड्यांनी एका पिढीचे भविष्यच अंधारमय केले आहे. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
कोकणातील गावातील तरुण रोजगाराच्या अभावामुळे शहरांकडे जात आहेत. गावं ओस पडली आहेत. अनेक घरांत वयोवृद्ध मंडळी एकटेपणाने जगत आहेत. मुलगा किंवा सून परदेशात असते, याचा अभिमान त्यांच्या मनात असतो, पण सोबत नसल्याची खंत सतत जाणवत असते.
यामुळेच उद्योग, प्रकल्प आले की लक्ष्मीही येईल, एवढे मात्र निश्चित!












