खेड (प्रतिनिधी) कोचुवेली ते श्री गंगानगर धावणाऱ्या रेल्वे गाडीला खेड स्थानकात थांबा मिळवा, अशी मागणी राजस्थानी विष्णू समाज (कोकण विभाग) ट्रस्टतर्फे कोकण रेल्वेकडे निवेदन देऊन केली आहे.
या बाबत देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून खेड, दापोली व मंडणगड या तीन तालुक्यातील मोठ्या संख्येने लोक रेल्वे प्रवास करतात. कोचुवेली ते श्री गंगानगर ही रेल्वे रविवारी असते व श्री गंगानगर ते कोचुवेली ही ट्रेन बुधवारी असते. खेड रेल्वे स्थानकात या रेल्वेला थांबा नसल्यामुळे या गाडीतून प्रवास करता येत नाही. तसेच रविवारी मुंबईला जाणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी असल्यामुळे तिकीट काढूनही प्रवाशांना गाडीत चढता येत नाही. या नंतर मुंबईकडे जाणारी गाडी नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या गाडीला खेड स्थानकात थांबा मिळाल्यास प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.
खेड, दापोली, मंडणगड या ३ तालुक्यात राजस्थानी समाजातील बरेच लोक राहतात त्यांना त्यांची गावी ये जा करण्यासाठी ही ट्रेन खूप फायदेशीर ठरणार आहे. यामुळे या गाडीला खेड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा, अशी मागणी राजस्थानी समाजाच्या शिष्टमंडळाने केली आहे.











