खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे सार्वजनिक सुलभ शौचालय उभारणीची मागणी करूनही गेले वर्षभर त्याकडे ग्रामपंचायतीसह प्रशासनाने दुर्लक्षकेले आहे. आहे. शौचालयाच्या उभारणीचे काम हाती न
घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मोरे यांनी दिला आहे.
महामार्गावरील भरणेनाका हे नेहमीच गजबजलेले ठिकाण आहे. छोट्या-मोठ्या दुकानांमुळे ग्राहकांचीही तितकीच गर्दी असते. मंगळवारच्या आठवडा बाजारात भाजीपाला विक्रेत्यांसह ग्राहकांची रेलचेल दिसते. तसेच महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर येथे वाहनांसह नागरिकांची मोठी वर्दळ वाढली आहे. या ठिकाणी सुलभ शौचालयाअभावी नागरिकांची विशेषत: महिलांची मोठी गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने ही बाब गांभीर्याने घेण्याची मागणी मोरे यांनी केली आहे.











