लोकसंगीतातून शाहीर नंदेश उमप यांनी शेवटचा दिवस गाजवला
संतोष कुळे | चिपळूण : कोकण हे लोककलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याच कोकणच्या मातीत आहे शौर्य शिवबांचे, या मातीत आहेत शब्द शाहिरांचे, मातीत तत्व आहे संत विचारांचे आणि कष्ट आहेत शेतकऱ्यांचं . असा याच मातीत विविध रंगी लोकसंगीताने आणि लोककलेने नटलेला कार्यक्रम शाहीर नंदेश उमप यांनी सादर केला. रसिकांच्या मनावरती अधिराज्य करत कृषी महोत्सवातील शेवटचा दिवस नंदेश उमप यांनी चिपळूणमध्ये गाजवला.
चिपळूण येथील कृषी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी रात्री ८.४५ वाजता सुरू झालेला लोक संगीत नजराणा असलेला बहारदार कार्यक्रम स्वर्गीय शाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत आणि मराठी विविधरंगी लोकसंगीत कार्यक्रम शाहीर नंदेश उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केला. या कार्यक्रमाला सुद्धा चिपळूणकरांनी न भूतो न भविष्यअसाच प्रतिसाद दिला.
” आधी गणाला रणी आणू या, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना…” या पट्टे बापूराव यांच्या गणाने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात करण्यात आली. त्यानंतर लोकसंगीताचे अनेक पैलू सादर करताना बहिणाबाई चौधरी यांच्या काही ओव्या शाहीर नंदेश उमप यांनी रसिकांना ऐकवल्या. त्याच्यामध्ये “माय म्हणता म्हणता ओट ओटाला भिडे, अन आत्या आत्या म्हणता केवढ अंतर पडे..” यामध्ये त्यांनी बहिणाबाईंच्या ओवीचा भावार्थ समजून सांगत नात्यातील उबदार गोडवा सांगितला. त्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातली सकाळ कशी होते. हे सुद्धा त्यांनी कार्यक्रमातून दाखवून दिले. “मला ग बाई जागा आली, कोंबड्याने बांग दिली सुपात जोंधळे वैची ते” या गाण्याने रसिक देहभान विसरले. पण खऱ्या अर्थाने कार्यक्रमाची रंगत आणि तल्लीनता वाढली ती हरिनामाच्या गजराने. नंदेश उमप यांनी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी.. हा अभंग गाथा गाथा पुढे विठ्ठल नामाचा गजर करत “जय जय राम कृष्ण हरी” या नाम घोषाने संपूर्ण पेंडॉल मधील रसिकांना भक्तीच्या सागरात आणि विठुरायाच्या नाम जयघोषात नाचाया आणि डोलायला भाग पाडले. ही या कार्यक्रमातील आणि लोकसंगीतातील ताकद शाहीर नंदेशने दाखवून दिली.
महाराष्ट्राच्या कणाकणात आपली संस्कृती लोककलेच्या आणि लोकसंगीताच्या माध्यमातून फुलताना दिसते. त्यानंतर भावाणांवरती आरूढ होते ते भारुड. हा एक लोककलेतील प्रकार त्यांनी सादर करतानाच शाहीर विठ्ठल उमप यांनी गायलेले “फु बाई फु फुगडी फु” या गीतातून भारुड मनोरंजनातून प्रबोधन कसे करते ते दाखविले.
आदिवासी संस्कृतीतील जीवन पद्धती आणि त्यांची बोलीभाषा यावरही कार्यक्रमांतून प्रकाश टाकला. भक्ती रसाबरोबरच राधा कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन करणारी आणि भक्तीप्रेमाचा महिमा सांगणारी गौळण सादर केली. ” यमुनेच्या तरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी” या गवळण गीतावर नंदेश उमप यांनी लहानथोराना अक्षरशः नाचवले. स्वतः कृषी महोत्सवाचे आयोजक आणि वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांचे ही पाय थिरकले.
लोकसंगीताचा बाजच असा आहे की, कितीही काळ बदलला किंवा संगीताचा प्रकारही बदलला तरी लोकसंगीत हे कायम अजरामर राहणार आहे. यातूनच आपली संस्कृती पुढच्या पिढीला समजते.
कार्यक्रमात पुढे लावणी नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर दोन ढोलकी वादकांच्या जुगलबंदीने रसिक भारून गेले.
गोंधळ, लगीन गीत, नृत्य यातून रसिकांचे मनोरंजन करताना शाहीर नंदेश उमप यांनी “प्रतापगडच्या पायथ्याशी खान” हा शिवरायांचा पोवाडा सादर केला. यावेळी त्यांनी शिवस्वराज्य सर्वांच्या डोळ्या समोर उभे केले. प्रशांत यादव यांनी त्यांचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले. लोकसंगीताचा या कार्यक्रमाला रसिकांनी शेवटपर्यंत साथ दिली. चिपळूणकरांनी पुन्हा एकदा कार्यक्रम हाऊसफुल्ल करत कलेचा जाणता उपासक असल्याचे दाखवून दिले.
चौकट
“शाहीर स्व. विठ्ठल उमप यांची छबी तुमच्यात दिसते – प्रशांत यादव
लोकसंगीताचे बाळकडू तुम्हास लहानपणापासून मिळाले आहे. स्व. विठ्ठल उमप यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहात याचा अभिमान आहे. या कृषी महोत्सवात तुमचे पाय लागले हे आमचे भाग्य आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. मात्र, यात माझी पत्नी सपना यादव यांचे योगदान मोठे आहे. प्रशासनाने सुध्दा उत्तम सहकार्य केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कृषी महोत्सव हा आदरणीय नेते शरदचंद्र पवार यांनी केलेल्या सुचणे प्रमाणे करू असे ही सांगितले.











