चिपळूण (प्रतिनिधी) : वालावलकर हॉस्पिटलच्या वैद्यकीय चमूने कानातील अतिशय सूक्ष्म अशा हाडाचे मायक्रोस्कोपिक ऑपरेशन केले ज्यामुळे महिलेला ऐकू यायला लागले. एका ३५ वर्षीय रत्नागिरी येथील महिलेला वर्षभरापासून ऐकू कमी येण्याचा त्रास होत होता. त्यासाठी तिने खुप सारे औषधोपचार केले. अनेक डॉक्टरांना दाखवले पण काही फरक पडला नाही. शेवटी तिने वालावलकर हॉस्पिटलच्या कान – घसा विभागातील डॉ. राजीव केणी आणि डॉ. प्रतीक शहाणे यांना दाखवले. डॉक्टरांनी तिची कानाची तपासणी केल्यावर असे निदर्शनास आले की ऐकू न येण्याची जी कारणे आहेत जसे की, कानाचा पडदा फाटणे, कानाच्या हाडांमध्ये रोग असणे किंवा वयोमानानुसार नस कमजोर होणे यापैकी एकही कारण तिच्या बाबतीत नव्हते. तेव्हा डॉक्टरांनी तिची ऑडिओमेट्री कानाच्या मशीनची तपासणी आणि इम्पिडन्स या दोन टेस्ट केल्या या नंतर असे कळाले की कानाच्या आतील सूक्ष्म हाडे फिक्स झाल्यामुळे तिला ऐकायला येत नाही आहे. हे निदान लक्षात येताच डॉक्टरांनी तिला ऑपरेशनचा सल्ला दिला.
” आपल्याला ऐकू येणार ” या आनंदाच्या बातमीने महिलेने लगेच ऑपरेशन करण्याची तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी आणि डॉ. प्रतीक शहाणे या इ एन टी सर्जन्स ने अतिशय कुशलतेने कानातील सूक्ष्म हाडाचे मायक्रोस्कोपिक ऑपरेशन यशस्वीरित्या केले. ऑपरेशन नंतर ऐकू यायला लागल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान होते. अतिशय अवघड असे ऑपरेशन यशस्वीरीत्या केल्याबद्दल डॉ. राजीव केणी व डॉ. प्रतीक शहाणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.












