Gokhale Bridge will be open for traffic from March 2024
पालिकेचा दावा; नोव्हेंबरपासून एका मार्गिकेवर वाहतूक
मुंबई (प्रतिनिधी) : धोकादायक झाल्याने अंधेरीतील गोखले पुलाचे काम सुरू आहे. या कामाकरिता नोव्हेंबर २०२२ पासून पूल वाहतुकीसाठी बंद आहे. मे २०२३ पर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीखालील खोदकाम पूर्ण करण्यास जुलै उजाडणार आहे. त्यामुळे एक मार्गिका नोव्हेंबर महिन्यात खुली होणार असून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी मार्च २०२४ मध्ये खुला होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरीहून बोरिवली व दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
गोखले पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पाडून मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र रेल्वे हद्दीतील भाग हस्तांतरित होऊन दोन महिने उलटले तरी काम संथगतीने सुरू आहे. रेल्वे हद्दीत जमिनीखाली ५ मीटर खाली खोदकाम सुरू असून खोदकाम पूर्ण होण्यास जुलै महिना उजाडणार आहे. त्यामुळे पुलाचे प्रत्यक्षात काम ऑगस्ट महिन्यात सुरू होईल आणि एक लेन नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरित काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि पुलावरील वाहतूक मार्च २०२४ पासून सुरू होईल असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
अंधेरी सब वेमध्ये पाणी तुंबत असल्याने या ठिकाणी दहा पोर्टेबल पंप बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे पुलाचे बेरिंग तातडीने बदलण्यात आल्याने वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, अंधेरी मिल्लत नगर असे पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.











