जि.प.व पं.स. निवडणुकीच्या तोंडावर वेंगुर्ले मध्ये शिंदे शिवसेनेने पाडले उबाठा सेनेला खिंडार…

तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर वेंगुर्ले मध्ये शिंदे शिवसेनेने उबाठा खिंडार पाडली आहे. उबाठा शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी शहर प्रमुख अजित राऊळ, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाट यांच्या सह अनेक उबाठा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज सोमवारी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षांमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत व अभिनंदन करून आमदार केसरकर यांनी सर्वांना योग्य तो मान सन्मान दिला जाईल असे सागून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जोमाने काम करा असे आवाहन केले.

वेंगुर्ले येथील स्वामींनी मंगल कार्यालयात शिवसेना पक्ष प्रवेश आणि मेळावा आम. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनील डूबळे, प्रभारी तालुकाप्रमुख सचिन देसाई, नगरसेविका लीना म्हापणकर, उपतालुका प्रमुख संजय गावडे, महिला तालुकाप्रमुख शितल साळगावकर, कौशिक परब, पिंटू गावडे, स्वप्नील गावडे, टिना आल्मेडा, कोस्टल तालुका प्रमुख काशिनाथ नार्वेकर, दिनेश गावडे आदी उपस्थित होते.

झालेले या प्रक्ष प्रवेशामध्ये उबाठा वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, युवासेना तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी वेंगुर्ले शहर प्रमुख अजित राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता परब, अल्पसंख्यांक उपजिल्हा प्रमुख कार्मिस आल्मेडा, उप तालुकाप्रमुख तुकाराम परब, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, तुळस विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, युवा सेना उपशहर प्रमुख वैभव फटजी, महिला आघाडी शहर संघटिका कोमल सरमळकर, मकरंद गोंधळेकर यांच्या सह तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

सचिन वालावलकर यांनी प्रास्ताविक करताना तालुक्यात या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेकडून आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झालेल्या आणि होणाऱ्या कामाबाबत माहिती दिली. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षांमध्ये स्वागत करून तुमच्या भागातील प्रश्न समस्या मार्गी लावण्यासाठी आणि तुम्हाला योग्य सन्मान देण्यासाठी शिवसेना नियमित प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.

प्रभारी तालुका प्रमुख सचिन देसाई यांनीही या नवीन पक्षप्रवेशामुळे शिवसेना अजून जोमाने तालुक्यात उभे राहून एक नंबरचा पक्ष बनण्यासाठी प्रयत्न करेन असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन वालावलकर यांनी मानले.