आंबा बागायतदार संघटनेचे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी : पंतप्रधान फळ पिक विमा योजनेत सहभागी आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात आहे. सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील सर्वच आंबा काजू बागायतदारांना लहरी हवामानाचा फटका बसून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, निरवडे तसेच कुडाळ तालुक्यातील गोठोस,ओरोस बुद्रुक व दोडामार्ग तालुक्यातील तळकट अशा पाच मंडळातीलजवळ सुमारे १२ कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना विमा परतावा आजमितीस मिळालेला नाही. त्यामुळे येत्या २२ जानेवारीपर्यंत सदरचा परतावा न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी शेतकरी आत्मदहन करतील असा इशारा आंबा बागायतदार संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,, सन २०२३ – २४ मध्ये जानेवारी ते मे महिन्या दरम्यान अवकाळी पाऊस तसंच अति तापमान व त्यातच फळमाशीचा प्रादुर्भाव यामुळे आंबा पिकामध्ये लक्षणीय अशी घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले होते.
मात्र, वर्ष उलटून गेले तरीही निरवडे मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पर्यंत विमापरतावा जमा झाला नाही. याबाबत आंबा बागायतदार संघटनेच्या पाठपुराव्यानंतर कृषी विभागाने वारंवार संबंधित विमा कंपनीशी पत्र व्यवहार करूनही विमाकंपनीने याची दखल घेतली नाही. २०२४ चा फळपीक विमा परतावा वेळेत न मिळाल्याने २०२४ – २५ च्या फळ पिक विम्यामध्ये काही शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे सावंतवाडी व निरवडे मंडळातील शेतकऱ्यांना पुढे या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ५६ मंडळापैकी ५१ मंडळातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळाला आहे. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी व निरवडे तसेच कुडाळ तालुक्यातील गोठोस व ओरोस बुद्रुक तर दोडामार्ग तालुक्यातील तळकट अशा प मंडळातील सुमारे १२ कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना विमा परतावा आजमितीस मिळालेला नाही.
त्यामुळे शेतकरी मेटाकूटीस आले असून २२ जानेवारी पर्यंत फळ पिक विमा परतावा न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी निरवडे मंडळतील शेतकऱ्यांनी आत्म दहनाचा इशारा दिला आहे.यात विमा कंपनीने ५१ मंडळाना अदा केलेली विमा नुकसानी कुठच्या जी आर प्रमाणे आणि पाच मंडळे वंचित ठेवलेली आहेत ती कुठच्या निकषाआधारे याचा लेखी खुलासा देणे ही कंपनीची जबाबदारी आहे, अशीही मागणी या निवेदनद्वारे केली आहे. शासकीय यंत्रणा आणि लोक प्रतिनिधी यांची विमा कंपनी वर वचक नसल्याने आज आत्म दहनासारखी वेळ कोकणातल्या शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे हे आम्हा शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल आम्हा शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून आमचे हक्काचे पैसे मिळवून देणारा वाली कोण अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून देण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हा कृषी अधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी आंबा बागायतदार संघटनेच्या उपाध्यक्षा दिव्या वायगणकर, सदस्य तसेच शेतकरी दाजी तुळसकर, सुरज डिचोलकर, रमेश नाईक, प्रताप चव्हाण, सीताराम घोगळे, बाबुश घोगळे, सुभाष राऊळ, जालंधर परब, शंकर राऊळ, नागेश गावडे, भरत सुभेदार आदी शेतकरी उपस्थित होते.











