नेमळे येथे महामार्गावर मासे वाहतूक करणारा कंटेनर पलटी

चालकाचा मृत्यू : एक जण बचावला

सावंतवाडी : कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने जात असताना महामार्गावर चालकाला झोप लागल्याने कंटेनर रस्त्यालगत पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा चालक या अपघातात बालबाल बचावला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक येथून गुजरातच्या दिशेने मासे वाहतूक करणारा कंटेनर
झाराप – पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना चालकाला झोप आल्याने कंटेनर रस्ता सोडून बाजूला गेला व सुमारे २० फूट खोल खाईत पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक मोहम्मद आमीद अशरफ ( ४२, रा. बेलपू, उडपी, कर्नाटक ) हा जागीच ठार झाला. नेमळे कुंभारवाडी येथे शनिवारी पहाटेच्या चारच्या सुमारास हा अपघात घडला.
सुदैवाने या चालकासोबत असलेला दुसरा सहकारी अपघातात बचावला.

अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस हवालदार मनोज राऊत, पोलिस हवालदार गलोले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या अपघाताची फिर्याद मयत मोहम्मद याचा सहकारी सुलेमान हसन साहब ( ४३, रा. चित्तूर उडपी कर्नाटक ) याने सावंतवाडी पोलिसात दिली असून मयत चालक मोहम्मद आमीद अशरफ याच्या विरोधात अपघात करून स्वतःच्या मृत्यू तसेच सहकाऱ्याच्या दुखापतीस व गाडीच्या नुकसानीस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.