दोडामार्ग l प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळ यांचे ५२ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र चिमूर (जि. चंद्रपूर) येथे संपन्न झाले. यामध्ये श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे प्रशालेचे लिपिक तथा दै. प्रहारचे दोडामार्ग तालुका प्रतिनिधी सुहास देसाई यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी महामंडळ अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, राज्य उपाध्यक्ष प्रिया पवार, सरीता कुलकर्णी ,खैरुद्धिन सय्यद, श्रीधर गोंधळी, मुबई सचिव देविदास पंडागळे, विभागीय सचिव पुणे डॉ. गोविंद पांडूळे, कोल्हापूर विभागीय सचिव गजानन नानचे यांचे सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील पाल गावात सुहास देसाई यांचा सन १९७९ मध्ये जन्म झाला. अर्थशास्त्र विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण वाळके गोगटे कॉलेज पानवळ येथे पूर्ण केले. त्यानंतर कॉलेज जीवनात प्रतिनिधी म्हणूनच काम करताना काँग्रेस प्रणित एनएसयूआय, विद्यार्थी परीषद आदी चळवळी, संघटनांमध्ये काम केले. त्याचवेळी ‘शिका आणि कमवा’ या उपक्रमासाठी दैनिक सकाळमध्ये निवड झाली. त्यानंतर लिखाण केले व वृत्तपत्र विद्यापदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात दैनिक पुढारीमध्ये गोवा राज्यात पणजीत रुजू झाले. काही काळानंतर दैनिक पुढारीत दोडामार्ग तालुका प्रतिनिधी म्हणून दहा वर्षे काम केले. यात तिलारी खोऱ्यात गांजा लागवड प्रकरण, शिक्षक बदली लाच प्रकरण, हत्ती पकड मोहीम आदींवर परखड लिखाण केले. या कार्याची दखल घेत सन २००४ मध्ये पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांनतर सन २००८ मध्ये कोकणातील दैनिक प्रहारमध्ये रुजू झाले. माझा गाव माझा विकास, तिलारी आंतरराज्य प्रकल्प पांढरा हत्ती, तिलारी धरणग्रस्तांचे पुनर्वसन व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी लिखाण केले व शासनाच्या समितीवर काम केले. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या जिल्हा मूल्यमापन समितीवर पाच वर्षे कार्यरत राहुन शंभर गावे तंटामुक्त होण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले. याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी म्हणून बाळशास्त्री जांभेकर भवन व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले.
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेच्या दहा शाळांपैकी न्यू इंग्लिश स्कूल मडुरा ता. सावंतवाडी येथे कनिष्ठ लिपिक म्हणून सन २००४मध्ये पहिली नेमणूक झाली. त्यांनतर न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भेडशी ता. दोडामार्ग येथे दहा वर्षे कार्यरत होते. सद्यस्थितीत श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे या प्रशालेत कार्यरत आहेत. तसेच शाळा समिती शिक्षकेतर कर्मचारी सदस्य म्हणून काम पाहतात. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा उपाध्यक्ष, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्हास्तरावर युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार समितीवर सदस्य म्हणून काम केले. नेहरु युवा केंद्राच्या गोवा व महाराष्ट्र राज्यातील युवा चळवळीत मोठे योगदान दिले आहे. विद्यमान गोवा राज्यांचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत तत्कालिन युवा क्षेत्रातील युवा समन्वयक के के घाटवळ यांचे समवेत अनेक कार्यक्रम राबविण्यात आले यात सहभाग घेतला होता त्याची दखल घेत राष्ट्रीय युवा पुरस्काराने नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले होते.
गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे ५१व्या शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळ राज्यस्तरीय अधिवेशनात प्रसिद्धी प्रमुख म्हणून योगदान दिले. स्मरणिका प्रकाशन प्रमुख तथा संपादक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे.












