कोंबडीच्या शिकारीसाठी आलेला बिबटयाच अडकला खुराडयात

करक तांबळवाडी येथील घटना

वनविभागाने सुखरूप केली बिबडयाची सुटका

राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील करक तांबळवाडी येथील आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये अडकलेल्या बिबट्याला सुखरूप पिंजऱ्यात जेरबंद करत वनविभागाने जीवदान दिले आहे. सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय एक ते दीड वर्ष असल्याची व तो सुस्थितीत असलेची माहिती पशुधन विकास अधिकारी राजापूर दिल्यानंतर वनविभागाने या बिबटयाला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. खुराडयात कोंबडी फस्त करण्यासाठी हा बिबटया या लोखंडी खुराडयात शिरला आणि स्वताच अडकला. सोमवारी २० जानेवार रोजी सकाळी ही घटना घडली आहे. हा बिबटया मध्यरात्री खुराडयात अडकला असावा असा कयास आहे.

करक तांबळवाडी येथील आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम चालू असून या घराजवळ असलेल्या लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबटया अडकला असल्याची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनी दिली. याबाबत तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर या बिबटयाला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले. या ठिकाणी परिस्थिती लक्ष्यात घेऊन प्रथमदर्शी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रिन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावून बिबट्या अडकला असलेल्या खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेण्यात आले. यानंतर तात्काळ या बिबटयाची पशुधन विकास अधिकारी राजापूर यांचेकडून तपासणी केली असता, सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय एक ते दीड वर्ष असल्याची व तो सुस्थितीत असलेची माहिती पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी दिली. यानंतर वनविभागाकडून सदर बिबट्या सुस्थितीत असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

सदरची कार्यवाही मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई मॅडम व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीम.प्रियांक लगड,वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कामगिरीसाठी रत्नागिरी , वनक्षेत्रपाल श्री.प्रकाश सुतार , वनपाल राजापूर श्री. जयराम बावदाणे साहेब , वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार साहेब , वनरक्षक श्री.जालने व रेस्क्यू टीमचे श्री.दीपक चव्हाण, श्री.दीपक म्हादये, श्री.नितेश गुरव, श्री.अमित बाणे , श्री.निलेश म्हादये आदींसह स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातुन करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.