सावंतवाडीतील प्रकार : टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
सावंतवाडी । प्रतिनिधी : आडेली येथून चंदगड येथील कत्तलखान्यात नेण्यासाठी होणारी तीन गुरांची अवैध वाहतूक सोमवारी पहाटेच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षा आयामचे अध्यक्ष दिनेश गावडे व बजरंग दलाचे संयोजक कृष्णा धुळपणवार यांच्या नेतृत्वात गोरक्षकांनी रोखली. याबाबत पोलिसांना खबर देताच पोलिसांनी खातरजमा करून याप्रकरणी टेम्पोचालक मनोज मंगेश सावंत (३४, रा.आकेरी ) याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तर टेम्पोतील तिन्ही गुरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली.
आडेली येथील तीन गुरे मॅक्सिमो टेंपोमध्ये भरून त्यांची चंदगड येथील कत्तलखान्यात वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षक स्वागत नाटेकर यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सोमवारी पहाटे ४.५० च्या सुमारास पाठलाग करीत सावंतवाडी जिमखाना मैदानालगत सदरचा टेम्पो ( एम एच ०७ पी ३६३८) गोरक्षकांनी अडवला. यावेळी टेम्पोत तीन गुरे दाटीवाटीने बांधून त्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी त्वरित ही वाहतूक रोखून सावंतवाडी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलीस हवालदार श्रीरंग टाकेकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबतची खातरजमा केल्यानंतर टेम्पो चालक मनोज सावंत याला ताब्यात घेतले. या टेम्पोत रुपये २० हजार किंमतीचा एक, रुपये १५ हजार किंमतीचा १ व रुपये ११ हजार किंमतीचा एक असे मिळून तीन बैल ( गोवंश ) आढळून आले.मात्र, टेम्पो चालकाकडे गुरे वाहतूक परवाना, खरेदी पत्र, जनावरांचे फिटनेस सर्टिफिकेट आदि कागदपत्रे नसल्याने याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण ( सुधारणा ) अधिनियम २०१५ कलम ५ ( ए ) ५ ( बी ) ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध केल्याबाबत तसेच बेकायदेशीरपणे गुरांची निर्दयपणे व क्रूरपणे दाटीवाटीने असुरक्षितरित्या बांधून वाहतूक करणे त्यांच्या चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करणे याप्रकरणी ठपका ठेवत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरक्षक स्वागत नाटेकर यांनी सदर प्रकार वरचेवर होत असून कत्तलखान्यासाठी गुरे नेत असताना काही स्थानिक लोकांना पैशांचे आमिष दाखवून हाताशी धरण्यात येत आहे. तर गुरांच्या मालकांना गुरे कत्तल खाण्यासाठी न नेता ती इतर कोणत्यातरी कारणासाठी नेत असल्याचे भासवून गुरे नेली जातात. हे प्रकार रोखण्यासाठी गोरक्षक तसेच पोलिसांसोबतच नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कायद्याची कठोर अंमलबजावणी केल्यास हे प्रकार रोखण्यास मदत होईल असे ते म्हणाले












