खेड(प्रतिनिधी) सहजीवन शिक्षण संस्था संचलित श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक राकेश देवरुखकर यांच्या कलाकृतीला राज्य शासनाचा तिसऱ्यांदा पुरस्कार जाहीर झाला आहे. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई-जहाँगीर आर्ट गॅलरी येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या ६४ व्या कला प्रदर्शनात कलाकृती मांडण्यात येणार आहे. राज्यातील १५ कलाकारांच्या कलाकृतीला राज्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. राकेश देवरुखकर यांना यापूर्वी २०१७ व २०२२ मध्येही पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रकलेसह विविध कलाक्षेत्रात ते अग्रभागी असून तैल रंगावर त्यांचे कमालीचे प्रभुत्व आहे. जल रंगाच्या विविध छटा त्यांना अवगत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी विविध संस्थांसह विविध क्षेत्रात ठसा उमटवत आहेत.
कोकणचा राकेश देवरूखकर निसर्ग त्यांनी आपल्या कुंचल्यातून सर्वदूर पोहचवला आहे. यावर्षीही निवड झालेल्या चित्रात निसर्गचित्र हाच चित्राचा विषय असून कलाकाराच्या नजरेतून रसिकांना न्याहाळता येणारे सौंदर्य साऱ्यांनाच अंतर्मुख करते. राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष हिराचंद बुटाला, संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, प्रशाला समिती चेअरमन राजेश बुटाला यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.










