Breaking: खेड तालुक्यातील आदर्श मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने मतदानास विलंब

; मतदारांचा तासभर वेळ वाया

खेड (प्रतिनिधी) – आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे मतदान सकाळपासून सुरू झाले असतानाच खेड तालुक्यातील बोरज येथील आदर्श मतदान केंद्रावर मोठा तांत्रिक अडथळा निर्माण झाला. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या पहिल्या पंधरा ते वीस मिनिटांतच मतदानासाठी वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन अचानक बंद पडले. त्यामुळे मतदानाची संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाली आणि मतदानासाठी आलेल्या मतदारांना केंद्रावरच तासभर थांबावे लागले.
ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर संबंधित निवडणूक कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक दुरुस्तीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मशीन सुरू न झाल्याने अखेर ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी आणि ते कार्यान्वित करण्यासाठी जवळपास एक तासाचा कालावधी लागला. या कालावधीत मतदान केंद्रावर रांगा लागून राहिल्या असून अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
विशेष म्हणजे बोरज हे आदर्श मतदान केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र मतदानाच्या सुरुवातीलाच मशीन बंद पडल्याने निवडणूक प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मशीन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असली तरी सुरुवातीचा एक तास मतदारांचा वाया गेला आहे. हा वाया गेलेला वेळ मतदारांना भरून मिळणार का, मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात येणार का, याबाबत मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, निवडणूक प्रशासनाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा असून तांत्रिक बिघाडामुळे मतदारांच्या हक्कावर गदा येऊ नये, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.