मनसेचे प्रांताधिकारी यांना निवेदन
खेड (प्रतिनिधी) उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे अनागोंदी कारभार सुरू आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालय हे गोरगरिब जनतेसाठी वरदान ठरत होते. शासनाने करोडो रुपये खर्च करून इमारत स्टाफ, औषधे, मशिनरी उपलब्ध केल्या आहेत. परंतु या ठिकाणी अनागोंदी कारभारामुळे गरजवंत रुग्णांना या सुविधा उपलब्ध होत नसून त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देण्यात आले असून, उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनात कायमस्वरूपी स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध व्हावा, औषधसाठा वेळेवर उपलब्ध होत नाही, बाहेरून मागवावी लागतात, सर्व औषधे उपलब्ध व्हावीत, एम. आर. आय आणि सिटीस्कॅन मशिन धूळ खात पडली आहेत, त्या त्वरित सुरू कराव्यात, ग्रामीण भागातील सामान्य रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, भूलतज्ज्ञ उपलब्ध व्हावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे.
उपविभागीय कार्यालय सोबत खेड तहसीलदार कार्यालय, खेड पोलिस स्टेशन व कळंबणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय अखाडे, मनसे खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, जयेश गुहागरकर व सर्वेश पवार आदी उपस्थित होते. या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात तसेच २६ जानेवारीपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे.










