मार्चअखेरपर्यंत होणार जमीनदोस्त
खेड (प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे जगबुडी नदी वरील ब्रिटिशकालीन पुलावरील रहदारीला गेल्या ३ वर्षापासून बंद आहे. धोकादायक पुलामुळे पादचायांकडूनही वापर बंद झाला आहे. त्यामुळे जगबुडी पूल पाडण्यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मार्चअखेरीसपर्यंत जुना पूल जमीनदोस्त करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याने अनेक महापूर तसेच भीषण अपघात यांचा साक्षीदार असलेला जगबुडी ब्रिटिशकालीन पूल विस्मृतीत जाणार आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील भरणेतील ब्रिटिशकालीन पूल महत्त्वाचा दुवा ठरला होता. या पुलावर अनेक प्राणांतिक अपघातही घडले आहेत. १९ मार्च २०१३मध्ये महाकाली आरामबसला झालेल्या भीषण अपघातात ३९ जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले होते. या भीषण अपघातानंतर जुन्या जगबुडी पुलाच्या डागद्दजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दरवर्षी अतिवृष्टीदरम्यान पुलावरून पाणी वाहू लागताच महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प होत होता. त्यामुळे या पुलाशेजारी अन्य पूल उभारणी करण्यात आली.
नव्या जगबुडी पुलाचे बांधकाम पूर्ण होताच गेल्या ३ वर्षांपासून जुन्या पुलाचा वापर पूर्णतः बंद झाला आहे. त्यामुळे अखेरची घटका मोजणारा जुना जगबुडी पूल धोकादायक स्थितीत उभा आहे. यापूर्वी जुन्या जगबुडी पुलावरून पादचायांची वर्दळ सुरू होती. मात्र नव्या पुलाच्या उभारणीनंतर पादचाऱ्यांच्या रहदारीचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे धोकादायक स्थितीतील जुना जगबुडी पूल कोसळून नजिकच्या नव्या पुलाला चोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोकण आयुक्त विभागाच्या अधिकाऱ्यानी पुलाची पाहणी करत जुना जगबुडी पूल पाडण्याच्यादृष्टीने उचित कार्यवाही करण्याबाबत वरिष्ठस्तरावर पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले.
महाड तालुक्यातील सावित्री पुलापाठोपाठ भरणे येथील जुना जगबुडी पूलही जमीनदोस्त केला जाणार आहे. उन्हाळ्यात जगबुडी नदीपात्रातील पाणीसाठ्यात घट होते. या नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर मार्च अखेरीपर्यंत जुना जगबुडी पूल पाडण्याच्या दृष्टीने कार्यवाही होणार आहे. यामुळे जुन्या जगबुडी पुलाबाबतच्या प्रवाशांसह पादचाऱ्यांच्या अनेक आठवणी विस्मृतीस जाणार आहेत.











