महाराष्ट्रात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी महायुतीची सत्ता स्थापन झाली. मंत्री मंडळ विस्तारही झाला. परंतु राज्यातील त्या-त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर व्हायचे होते. २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनापूर्वी पालकमंत्री जाहीर होणं अपेक्षित होतं. तसं ते जाहीर झाले देखिल. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर सुरूवातीपासूनच दावे-प्रतिदावे सुरू होते. ना. भरतशेठ गोगावले की ना.अदिती तटकरे अशी काहीशी रस्सीखेच रायगड पालकमंत्रीपदावरून होती. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची संख्या अधिक आहे. यामुळे रायगडमध्ये शिवसेनाही पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे. त्यावरही चर्चेनंतर मार्ग सापडेल. सध्याच महाराष्ट्रातील राजकारण हे युती, महायुती, आघाडी ते महाविकास आघाडी असं आहे. त्यामुळे राजकारणामध्ये समझोता एक्सप्रेस सर्वत्रच सुरू आहे. राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाला वाढायच आहे. पक्षसंघटन वाढवायच आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष पुढारी, नेते यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात गैर काहीच नसत. प्रत्येक पक्षाची वाढ करण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न होत असतात. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्योचे पालकमंत्री जाहीर झाले आहेत. कोकणात अपेक्षेप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद उदय सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्याकडे देण्यात आले आहे. रायगड च्या आणि नाशिक पालकमंत्रीपदाबाबतही निर्णय होईल. कोकणचा विचार करीत असताना रत्नागिरी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यांची निर्मिती होण्यापूर्वी एकच असलेला जिल्हा होता. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये निसर्गसौंदर्यात समानता आहे. समुद्राच्या किनारपट्टीवरचे हे जिल्हे आहेत. रायगड जिल्ह्यात औद्योगिकदृष्ट्या प्रगती होऊ शकली. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेला रायगड जिल्हा आदिवासींचा जिल्हा. यामुळे रायगडमध्ये कारखानदारी वाढली, रोजगाराच्या संधी काही प्रमाणात उपलब्ध झाली. परंतु तरीही ग्रामीण भाग आजही पूर्वीच्याच मानसिकतेत राहिला. गेली अनेकवर्षे राजकीयदृष्ट्या शेतकरी कामकरी पक्षाच्या विचारधारेशी जोडलेला हा जिल्हा. शेतकरी आणि कष्टकऱ्यांची असंख्य आंदोलन, मोर्चा निघाले. परंतु सामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक काही होऊ शकली नाही. कै. बॅ.ए.आर.अंतुले यांना देशाच्या आणिबाणी नंतर महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यांनी कोकणच्या विकासाचा जरूर धडाका लावला. परंतु १८ महिन्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. पाटील कुटुंबिय शेतकरी कामकरी पक्षाच्या विचारधरित काम करीत राहिले. रायगडच्या विकास प्रक्रियेत प्रयत्न जरूर केले. परंतु सत्ताकेंद्र पाटील परिवाराच्या परिधाबाहेर गेली नाही. त्यामुळे विकासाचा विचाराला मर्यादाच होत्या. त्यांच विरोधावर आधारित त्यांच राजकारण राहिलं. त्यामुळे विकासाच्या बाबतीतला विचार रूजला नाही. आणि फारसा कोणी केलाही नाही. रायगड जिल्ह्याच अनेकवर्षे पालकमंत्रीपद सुनिल तटकरे यांनी भूषविले आहे. परंतु कोकणातील कोणत्याही जिल्ह्याच्या विकासाचा विषय केवळ राजकारणात अडकलेला दिसेल. रत्नागिरी जिल्ह्यालाही विकासाची आस आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर लहान-सहान सामान्य जनतेची कामही होणं मुश्किल. स्व.बाळासाहेब सावंत, श्यामराव पेजे अशा ज्येष्ठांनी प्रयत्न जरूर केलेत. स्व.बाळासाहेब सावंत हे महाराष्ट्रातील एक वजनदार मंत्री कोकणच्या विकासाबद्दल त्यांना विशेष आस्था होती. परंतु बाळासाहेब सावंत, श्यामराव पेजे यांनी प्रयत्न करूनही विकासाचा रथ फार गतीमानतेने दौडू शकला नाही. १९९५ नंतर कोकणातील विकासप्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकली. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये विकासाला गती प्राप्त होऊ शकली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र खा.नारायण राणे यांचा मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मंत्रीमंडळात समावेश झाला आणि कोकणातील या तीन जिल्ह्यात विकासाला निधी आला. विविध योजना राज्यसरकारच्या माध्यमातून सुरू झाल्या. विकासनिधी मोठ्याप्रमाणावर येऊ शकतो. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे बजेट अधिकचे असू शकत. याचा प्रत्यय देखिल खा.नारायण राणे यांनीच कोकणाला दाखवून दिले. खा.नारायण राणे प्रथम सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाले तेव्हा विकासाचा आराखडा दुप्पट करण्यात आला. आरोग्य,पाणी आणि रस्ते विकासासाठी शेकडो कोटींचा निधी आणला. तेव्हा पशुसंवर्धन दुग्धविकास सोबत मत्स्य व बंदरे विकास विभाग होता. आताही योगायोगाने ना.नितेश राणे यांच्याकडे मत्स्यविकास व बंदरे विकास याच खात्याचा कारभार आला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडील उद्योगमंत्रालयाचा उपयोग कोकणात उद्योगांच जाळ विणलं गेलं पाहिजे. यासाठी व्हायला हवा कोकणातील रत्नागिरीचे पालकत्व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकत्व मत्स्यद्योग आणि बंदरे विकास विभागाचे मंत्री ना.नितेश राणे यांच्याकडे आहे. तब्बल ११ वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पद राणे कुटुंबात आले आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे पर्यटन नकाशावर आहेत. पर्यटनातून आर्थिक समृद्धी सक्षमता येण्यासाठी ना.नितेश राणे यांचे निश्चितच प्रयत्न असणारच आहेत. ना.नितेश राणे यांना अखंड कोकणच्या विकासाचे पालकत्वच घ्यायचे आहे.












