जानवळे येथील विवाहितेला धमकी व शिवीगाळ; गुन्हा दाखल

गुहागर | प्रतिनिधी : पिंग्मी संकलन करणाऱ्या गुहागर तालुक्यातील जानवळे येथील विवाहितेजवळ अश्लिल भाषेत बोलत, धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे याच्यावर गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुहागर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी संबंधित पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे हा तू मला खूप आवडतेस, माझ्याशी फोनवर बोल, अन्यथा घरी येऊन राडा करेन, तू मला भेटायला ये, शृंगारतळी येथे भाड्याची रूम घेऊन राहा, अन्यथा तुला संपवून टाकेन, असे सांगत अश्लिल शिवीगाळ करीत असे. त्याचबरोबर शृंगारतळी येथे पिग्मी संकलना गेल्यावर माझी पाठलाग धरत असे. त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला. चुलत दीर याने फोन केल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करीत दोन तासाने मोबाईल आणून दिला. या प्रकाराला कंटाळून अखेर १८ जानेवारी रोजी मी माझ्या पतीला हा प्रकार सांगितला. १९ जानेवारी रोजी याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, गुहागर पोलिसांनी याप्रकरणी उमेश शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ७८, ७९, ३५१ (१) व ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉस्टेबल लुकमान तडवी अधिक तपास करीत आहेत.