पालशेत बाजारपेठ येथे किरकोळ कारणावरून मारहाण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील पालशेत बाजारपेठ परिसरात असलेल्या ‘हॉटेल गारवा बिअर बार’मध्ये किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद भीषण हाणामारीत परिवर्तित झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत ५२ वर्षीय मच्छिमार गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणी गुहागर पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे काही काळ पालशेत बाजारपेठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद गोपाळ पालशेतकर (वय ५२, रा. पालशेत जाईलवाडी) हे १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आपल्या भाच्यासोबत पालशेत बाजारपेठ येथील हॉटेल गारवा बिअर बारमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी प्रेमनाथ अंकुश पटेकर हा तेथे आला आणि त्याने फिर्यादींना धक्का मारला. याबाबत फिर्यादींनी विचारणा केली असता, “मी जाणूनबुजून धक्का मारला, तुला काय करायचे आहे ते कर,” असे म्हणत आरोपीने त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली.
या घटनेनंतर वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन फिर्यादी बारमधून बाहेर पडले आणि आपल्या मोटारसायकलवर बसले. मात्र, तेथून निघण्याच्या तयारीत असताना आरोपी साहिल सीताराम पटेकर याने जमिनीवर पडलेला दगड उचलून फिर्यादींच्या डोक्यावर फेकून मारला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले.याचदरम्यान आरोपी प्रेमनाथ पटेकर याने हातातील लाकडी बांबूने फिर्यादींच्या डोक्यावर, पाठीवर व कमरेवर वार केले. त्यामुळे ते खाली पडले. खाली पडल्यानंतर आरोपी चिंतामणी गणू पटेकर याच्यासह तिघांनी मिळून फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मारहाण सुरू असल्याचे समजताच फिर्यादींची बहीण व भावजय त्यांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धावून आल्या. मात्र, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी प्रमोद पालशेतकर यांनी १० मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजता गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रेमनाथ अंकुश पटेकर, साहिल सीताराम पटेकर आणि चिंतामणी गणू पटेकर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम ११८(१), १२५(अ), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.