महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्यावतीने पुरस्कार
शिरगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्यावतीने देवगड तालुक्यातील किंजवडे-ठाकूरवाडी जि.प प्राथमिक शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
किंजवडे-ठाकूरवाडी शाळा पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असलेली असून सध्या तिची पटसंख्या १४ आहे. ही शाळा विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांत सातत्याने अग्रेसर राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शिक्षण क्षेत्रात नवनवीन कल्पना राबवण्यामध्ये शाळेने स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.
या प्रशालेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओरस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र, आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गौरव सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजप सरचिटणीस तथा किंजवडे गावचे सरपंच संतोष किंजवडेकर, माजी पं.स. सदस्य सुप्रिया वालावलकर, माजी सभापती सुधीर नकाशे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, प्रदीप परब, सुरेश परब, महेश तळवडेकर, जयदास परब, शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, सहशिक्षक महेश इंगोले ,आदी उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.









