समुद्रात वादळाचा धोका, नौका देवगड बंदरात आश्रयाला

देवगड : प्रतिनिधी

अरबी समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने मच्छिमारांनी खबरदारी म्हणून आपापल्या नौका देवगड बंदरात आणल्या आहेत. या नौकांमध्ये गुजरातमधील नौकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

हवामान विभागाने २८ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मच्छिमारांना या काळात समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी, समुद्रात गेलेल्या शेकडो नौकांनी देवगड बंदरात परत येऊन थांबा घेतला आहे.

स्थानिक नौकांसह गुजरात राज्यातील नौकाही देवगड बंदरात दाखल झाल्याने बंदर परिसरात गजबज निर्माण झाली आहे. अलीकडे मच्छिमारांना बांगडा, तोवर, पेडवे आणि गेजर या प्रकारच्या मासळ्यांचा चांगला भर मिळत होता. मात्र, हवामानातील अस्थिरतेमुळे मच्छिमारीवर मोठा परिणाम झाला असून बाजारात मासळीचे दर झपाट्याने वाढले आहेत.