धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशा विरोधात सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक ग्रामस्थांचे आमरण साखळी उपोषण सुरूच

 

जो पर्यंत मदरसा बंद होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा ग्रामस्थांचा ईशारा

प्रशासनाच्या बोटचेप्या धोरणाचा केला जाहिर निषेध

राजापूर (प्रतिनिधी): शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा प्रकरणी यापूर्वीच्या शासनाच्या आदेशाना न जुमानता सुरुच असल्याने व स्थानिक प्रशासनाने या अनधिकृत मदरशाबाबत कोणतीही कारवाई न केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी २६ जानेवारी पासून आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. सलग दुसऱ्या दिवशी हे साखळी उपोषण सुरू असून जोपर्यंत हा अनधिकृत मदरसा बंद करत नाहीत तोपर्यंत माघार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे.

रविवारी या उपोषण स्थळी प्रांताधिकारी डॉ.जास्मिन यांनी थेट दिली व आठ दिवसात यावर निर्णय घेतला जाईल तुर्तास उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र गेली वर्षभर प्रशासनाने या प्रकरणी काहीच केले नाही, आम्हाला झुलवत ठेवले आहे, त्यामुळे तुम्ही या अनधिकृत मदरशावर कारवाई करा मग आम्ही लगेचच उपोषण स्थगित करतो अशी भुमिका उपोषणकर्त्यांनी मांडली. राजापूर तहसीलदार कार्यालयासमोर हे आमरण साखळी उपोषण सुरू आहे.

हा अनधिकृत मदरसा पूर्णतः बंद करेपर्यंत आमरण साखळी उपोषण सुरु राहणार असून पुढील होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल असा इशारा पन्हळे तर्फे राजापूरच्या ग्रामस्थानी प्रशासनाला दिला आहे. तर या उपोषण स्थळी विविध राजकिय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह हिंदू संघटनांनी व शहर व तालुका परिसरातील अनेकांनी भेट देत आपला पाठिंबा जाहिर केला आहे.

पन्हळेतर्फे राजापूर या महसुली गावातील अनधिकृत मदरसा हा अत्यंत ज्वलंत, तसेच धार्मिक तेढ वाढविणारा विषय असून सदरहू मदरसा कायमस्वरूपी बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थानी यापुर्वीच केली आहे. यासाठी प्रथम २६ जानेवारी २०२४ रोजी आमरण उपोषण पुकारण्यात आले होते मात्र त्यावेळी तहसिलदार राजापूर यांनी तहसिलदार दालनामध्ये सदर दारुल हबीब जनरल एज्युकेशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट आणि पन्हळे तर्फे राजापूरचे ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेतली होती. मात्र सदर बैठकीला नायब तह‌सिलदार यांनी एकतर्फी भूमिका घेत ग्रामस्थांना आपले म्हणणे मांडण्याची सुयोग्य संधीही न देता सदर संस्थेला त्यांच्या इच्छेला येईल, तिथे भारतात कोठेही मदरसा चालू करून शकतात, असा कायदा असल्याचे ग्रामस्थानाच सुनावले होते. त्यांची ही एकतर्फी भूमिका न पटल्यामुळे व ती भूमिका ग्रामस्थांवर अन्याय करणारी असल्यामुळे २६ जानेवारी २०२४ रोजी ध्वजवंदनानंतर ग्रामस्थाना उपोषण करण्यास भाग पडले होते. याच उपोषणावेळी तत्कालीन तहसिलदार शितल जाधव यानी व्यक्तीशः उपोषणास्थळी येवून ग्रामस्थांशी चर्चा करताना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत या विषयात समंजस्य बैठक घेण्याचे वचन दिले. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ रोजीचे आमरण उपोषण तूर्तास स्थागित केले होते. मात्र त्यानंतर फेब्रुवारीअखेर आली, तरीही महसूल प्रशासनाकडून सदर सामंजस्य बैठक घेतली गेली नाही. म्हणून तोंडी विचारणा केली असता १ मार्च २०२४ रोजी प्रांताधिकारी यांचे पत्रावरून तहसिलादर दालनामध्ये घेतली गेली, त्या बैठकीत ही ग्रामस्थानां मान्य नसताना तहसिलदार, उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांचे शब्दाला मान देण्यासाठी सदर दारुल हबीब संस्थेला ३ महिन्याची म्हणजेच ३० मे २०२४ पर्यंतची मुदत देण्याचा पर्याय ग्रामस्थांनी मान्य केला. या मुदतीमध्ये सदर संस्थेने सर्व प्रकारच्या कायदेशीर परवानग्या घेतल्या तरच सदर मदरसा चालू ठेवता येईल, अन्यथा तो अनधिकृत मदरसा संपूर्णतः बंद करावा लागेल, असे या बैठकीत ठरवण्यात आले होते, असेही या वेळी उपोषणकर्त्यांनी प्रांताधिकारी यांच्यापुढे स्पष्ट केले होते.

उपरोक्त ३ महिन्याच्या मुदतीत म्हणजेच ३० मे २०२४पर्यंत सदर संस्थेने कोणतीही परवाणगी न मिळविता व भारतीय कायद्याचा कोणत्याही प्रकारे मान न ठेवता सदर मदरसा उद्दामपणे सुरू ठेवला आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाला तोंडी व लेखी कळवून सुद्धा त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही वा कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ रोजी तूर्तास स्थगित केलेले आमरण उपोषण १५ ऑगस्ट २०२४ रोजी पुनश्चः करण्याची नोटीस दिली. सदर नोटीस प्रशासनाला पोहोचताच उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतिरिक्त कार्यभार असलेले जीवन देसाई रत्नागिरी यांचे अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी राजापूर यांचे दालनात सदर दारुल हबीब संस्था व पन्हळेतर्फे राजापूर ग्रामस्थ यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, सरपंच ग्रामपंचायत धोपेश्वर व सर्व सदस्य, तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दिवाळीच्या सुट्टीपर्यंत म्हणजेच १५ नोव्हेंबरपर्यंत निव्वळ तेथील विद्याथ्यांचे शैक्षणिक नुक्सान होऊ नये म्हणून सदर मदरसा सुरू ठेवण्याच्या पर्यायाला ग्रामस्थांच्या मनाविरुद्ध उपस्थित सर्व मान्यवरांच्या शब्दाला मान देण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून व सहिष्णूतेच्या भावनेतून येथील ग्रामस्थानी मान्यता दिली. मात्र सदर बैठक घेऊन दिवाळीची सुट्टी संपून तीन महिन्यांचा कालावधी होऊन ही सदर संस्थेने कोणतीही परवानगी प्राप्त केलेली नाही व सदर अनधिकृत मदरसा सुरुच ठेवला आहे. प्रशासनाची ही भूमिका ग्रामस्थांना संशयास्पद व शंकास्पद वाटत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी बैठकीत ठरले असूनही सदर अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी कोणतीही कार्यवाही वा कारवाई किंवा दोन्ही अद्याप केलेली नाही त्यामुळे दि. २६ जानेवारी २०२५ रोजी यापूर्वी स्थगित केलेले आमरण उपोषण साखळी पद्धतीने पुन्हा सुरु करण्यात आले आहे. मात्र या वेळी सदर अनधिकृत मदरसा पूर्णतः बंद होईपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याच्या मध्यस्तीला अथवा आश्वासनाला विचारात घेतले जाणार नाही.

त्यामुळे आता स्थानिक ग्रामस्थांनी २६ जानेवारी पासून आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारपासून सुरू झालेल्या या साखळी उपोषणात स्थानिक ग्रामस्थांसह अमोल सोगम,पुरषोत्तम खांबल, धोपेश्वरचे माजी सरपंच दादा सोगम, संदिप सोगम, अरु मांजरेकर आदी पन्हळेतर्फ राजापूर ग्रामस्थांसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, महिला तालुकाध्यक्ष सौ.सुयोगा जठार ,कोषाध्यक्ष विवेक गुरव,शिवसेना (ठाकरे गट) विभाग प्रमुख संतोष हातणकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर, निकेश पांचाळ विश्वहिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष. अद्वैत अभ्यंकर, संदेश टिळेकर, दीलीप गोखले आदि हिंदू संघटनांचे पदाधिकारी या उपोषणात सहभागी झाले होते.