आजही जपली जात आहे श्रद्धेने परंपरा..
वेंगुर्ले l दाजी नाईक :जत्रा म्हटली की दशावतार हे आलच. पण वेंगुर्ले येथील श्री देव मानसीश्वर जत्रोत्सवातील दशावतारी नाटकाला वेगळी परंपरा आहे. येथे आजही पेट्रोमॅक्सच्या बत्यांवरच दशावतारी नाटक सादर होते. ते पाहण्यासाठी भाविक आणि नाट्यप्रेमींचीही गर्दी असते. पेट्रोमॅक्सच्या बत्तेवर सादर होणाऱ्या या दशावतारी नाटकाची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पाळली जात आहे.
दशावतार आणि बत्तेची नवसाची परंपरा या जत्रेतील एक अनोखी बाब. कोकणातील पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग येथील विशेष आकर्षण. हा खेळ प्राचीन पद्धतीने, पेट्रोमॅक्सच्या उजेडात रात्री एक वाजता सुरू झाला. मानसीश्वर जत्रोत्सवामध्ये यावर्षी भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. दिवसेंदिवस जत्रोत्सवाची व्याप्ती वाढत आहे. मात्र येथे नवस म्हणून अर्पण करण्यात येणारे भगवे निशाण, खेकडे आणि पेट्रोमॅक्स ची बत्ती ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि श्रद्धाळू भाविकांनी ती अजूनही तशीच चालू ठेवली आहे. त्यामुळेच उशिरा रात्री सुरू होणारे हे दशावतारी नाटक पाहण्यासाठी भाविकांची आणि नाट्यप्रेमींची गर्दी होती.












