खोंडेतील वणव्यातून पुन्हा घरे बचावली

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील खोंडे सुमन अपार्टमेंटनजीकच्या मोकळ्या जागेत वणवा लागण्याची घटना ताजी असतानाच खोंडे ज्ञानदीप हायस्कूलच्या मागे वणव्याने पुन्हा लागलेल्या ग्रामस्थांची धावाधावंच सुरू झाली. येथील नगर परिषदेच्या अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून नजीकच्या घरांना पोहोचणारा धोका टाळला.

येथे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने नगर परिषदेच्या अग्निशमन दलास कळवण्यात आले. फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, प्रणव घाग, वाहन चालक विद्याधन पवार यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून वणवा आटोक्यात आणण्याचे काम हाती घेतले. दत्तात्रय धुमक, दिलीप घाणेकर, वैभव भेकरे यांच्या घराकडे येणारा वणवा ग्रामस्थांच्या मदतीने २ तासांच्या आत प्रयत्नाने आटोक्यात आणताच साऱ्यांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.

खोंडे परिसरात वणवा लागण्याच्या सत्रामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वणव्यात गुरांचा चारा, गवताच्या गंजी जळून भस्मसात होत असल्याने शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत. वणवा नेमका लावतो कोण, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान ग्रामस्थांसमोर उभे ठाकले आहे.

भोस्ते अलसुरे मध्ये ही वणवा

सोमवारीही सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास भोस्तेसह अलसुरेत- वणवा लागल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतने लगतच्या आंब्याच्या बागा व मोबाईल टॉवर यांना पोहोचणारा धोका टळला. भोस्ते, अलसुरे रस्त्यालगत मुकादम यांच्या आंबाच्या बागांपर्यंत भडकलेला वणवा. आटोक्यात आणला. जलाल शहा कब्रस्तान जवळील मोबाईल टॉवरकडे येणारा वणवाही विझवण्यात यश आल्याने मोठा धोका टळला.