प्रवाशांची गर्दी वाढल्याने कोकण रेल्वेचा निर्णय
खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते थिविम दरम्यान आठवड्यातून एकदाच धावणारी विशेष रेल्वेगाडी आता आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्याने या विशेष रेल्वे गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.
मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या प्रचंड असते. त्यामुळे नियमित रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी १०० ते ३०० वर गेली आहे. तसेच विशेष रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होणे अशक्य झाले आहे. गाडी क्र. ०११२९ एलटीटी ते थिविम विशेष साप्ताहिक गाडी २०
एप्रिलपासून दर शनिवारी सुरू करण्याची घोषणा कोकण रेल्वेने १२ एप्रिल रोजी केली होती. तसेच गाडी क्रमांक ०११३० थिविम ते एलटीटी ही विशेष साप्ताहिक गाडी २० एप्रिलपासून दर रविवारी धावत होती. परंतु गेल्या तीन आठवड्यांत या गाड्यांना प्रवाशांची गर्दी वाढल्याने विशेष रेल्वे गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला.
दरम्यान, या रेल्वे गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत.











