केळवली उगवती ठोसर वाडीतील ओमकार पवारचे यश
राजापूर (वार्ताहर): अभ्यासातील सातत्य व चिकाटी आणि समोर ठेवलेल्या ध्येयाचा सातत्याने केलेला विचार यामुळे मनाशी बाळगलेले ध्येय सहज गाठता येते. त्यासाठी घेतलेले श्रम कधीही वाया जात नाहीत हे केळवली उगवती ठोसरवाडी येथील ओमकार प्रकाश पवार या तरुणाने सिध्द करुन दाखवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक व मंत्रालय सहाय्यक या दोन्ही परिक्षान्मध्ये ओमकार याने यश संपादन केले आहे.
गेली दहा वर्ष सातयाने पाठलाग करुन व अपार मेहनत घेवुन ओमकार याने या दोन्ही परिक्षा दिल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कर सहाय्यक या परिक्षेत यश मिळवतानाच त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मंत्रालय सहाय्यक परिक्षेत महाराष्ट्रातुन २४ वा तर कोकण विभागात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
सुरुवातीला पोलिस खात्यात पोलिस उपनिरिक्षक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ओमकार याने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पुर्व परिक्षा व मुख्य परिक्षाही उतीर्ण केली होती . मात्र मैदानी परिक्षेत उंची कमी भरल्याने त्याला त्याच्या या स्वप्नाने हुलकावणी दिली होती. मात्र त्यानंतर हार न मानता ओमकार याने उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत गेल्या दहा वर्षात जवळ जवळ वीस वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा दिली होती . मात्र यावेळी त्याने यशश्री खेचुन आणली आहे.
अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या ओमकार याने अतिशय मेहनत करुन हे यश संपादन केले आहे. स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातुन विशेष म्हणजे लोकसेवा आयोगाच्या माध्यमातुन असे यश मिळवणारा ओमकार हा केळवली गावातील पहिलाच तरुण असल्यामुळे गावातुन व परिसरातुन त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. दत्तगुरु एकता सेवा मंडळ केळवली उगवती ठोसरवाडी यानी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.












