अन त्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले अपघातग्रस्ताचे प्राण 

लांजा पोलीस निरीक्षकांकडून प्रसाद भाईशेट्ये यांचा सत्कार

 संतोष कोत्रे l        लांजा :- रात्रीच्या वेळी अपघातानंतर दरीत कोसळलेल्या मोटरसायकलस्वाराला लांजातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले प्रसाद भाईशेट्ये यांच्यामुळे वेळीच उपचार मिळून प्राण वाचले आहेत. ही घटना नुकतीच मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटात घडली होती .

दरम्यान प्रसंगावधान राखून अपघातग्रस्त मोटरसायकल स्वाराला रुग्णालयात पोहोचवून त्याचे प्राण वाचवल्याबद्दल लांजा पोलीस ठाण्याकडून प्रसाद भाईशेट्ये यांचा सत्कार करण्यात आला .

याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा शहरातील ठेकेदार आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले आणि शिवसेनेचे पदाधिकारी प्रसाद भाईशेट्ये

हे तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीहून आपल्या गाडीने लांजाकडे येत होते.मठ गाव सोडल्यानंतर आंजणारीचा उतार उतरत असताना महामार्गावर एक मोटार सायकल पडलेली आढळून आली. रात्री नऊच्या सुमाराची ही घटना होती. मोटारसायकलची एकूणच अवस्था पाहता या ठिकाणी अपघात झाल्याची शक्यता प्रसाद भाईशेट्ये यांच्या लक्षात आली. त्यांनी गाडी थांबवली व आजूबाजूला पाहिले . मात्र काळोख असल्याने कोणी आढळून आले नाही. मात्र मोटरसायकल पडलेली असल्याने कोणीतरी नक्कीच जखमी झाला असण्याची शक्यता होती.

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रसाद भाईशेट्येण यांनी बॅटरीच्या उजेडात या अपघातग्रस्त मोटरसायकल स्वराचा शोध घेतला असता हा अपघातग्रस्त मोटरसायकलस्वार महामार्गाच्या कडेला दरीऊ पडलेला आढळून आला. याबाबतची खबर भाईशेट्ये आणि तात्काळ लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांना दिली. प्रत्यक्ष दर्शनी हा तरुण मृत झाला असल्याची शक्यता वाटत होती. मात्र पोलीस निरीक्षक बगळे यांनी प्रसाद भाईशेट्ये यांना संबंधित व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दाखल करण्याचे आवाहन केले. त्यानुसार प्रसाद भाईशेट्ये यांनी या ठिकाणी आलेल्या मठ येथील कांबळे नामक व्यक्तीला सोबत घेऊन रिक्षाने संबंधित अपघातग्रस्त मोटरसायकल स्वराला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

अशाप्रकारे रात्रीच्या वेळी अपघातग्रस्त मोटारसायकल स्वाराला प्रसाद भाईशेट्ये यांच्या प्रसंगावधानामुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचू शकले. याबद्दल लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी प्रसाद भाईशेट्ये यांच्या या प्रसंगावधानाचे कौतुक करताना त्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.