२५ वर्षानंतर शाळेत रमले मित्र-मैत्रिणी

आबलोली :लोकशिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आबलोली (ता.गुहागर) या विद्यालयात सन १९९९- २००० साली शिक्षण घेत असलेल्या १० वी बॅच चा स्नेहमेळावा विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुंबई,पुणे, नाशिक, संगमेश्वर, राजापूर,गुहागर अशा ठिकाणाहून ४० मित्र-मैत्रीणी उपस्थित होते.

सकाळी १० वाजता ज्या शाळेत शिक्षण घेतलं, त्याठिकाणी सर्व शिक्षकांसमवेत राष्ट्रगीत घेण्यात आले.त्यानंतर शाळेतील एक वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सुचनेनुसार शिस्तबध्द पद्धतीने वर्गात प्रवेश केला.शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दिनेश नेटके यांची सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर उपस्थित मान्यवर दिनेश नेटके, नेत्रा रहाटे, आर.बी.अहिरे,तत्कालीन कर्मचारी बुद्धदास पवार आणि हरिश्चंद्र साळवी, प्रसन्ना वैद्य यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले.सत्कार मुर्ती बुद्धदास पवार माजी कर्मचारी यांनी एक कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.त्या नंतर सभा अध्यक्ष दिनेश नेटके सर यांनी अध्यक्षीय भाषणात जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.काही अविस्मरणीय क्षणांची आठवण करून दिली.शेवटी अशाच पद्धतीने तुम्ही सर्व जण सुख दुःखात ही एकत्र रहा असा संदेश दिला.त्या नंतर माजी विद्यार्थ्यांनी १५ हजार रुपये किंमतीचा कलर प्रिंटर शाळेला भेट म्हणून दिला.

शाळेतील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली या ठिकाणी सर्व मित्र- मैत्रीणी यांनी आठवणी, गमती-जमती यांसह विविध कार्यक्रम करून स्नेह भोजन करण्यात आले.या स्नेहमेळाव्याला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाला आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि निवेदक म्हणून प्रमोद गोणबरे यांनी जबाबदारी पार पाडली.

स्नेहमेळाव्याच्या यशस्वितेसाठी हेमंत पवार,राजा सुर्वे,विजय पागडे, प्रमोद पांचाळ,गणेश तोडकरी,आदेश पावरी, श्रध्दा साळवी, शिल्पा काजरोळकर, प्रज्ञा निमुनकर,विशाल जाधव,अनिल साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले. २५ वर्षानंतर शाळेच्या प्रांगणात पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व बालमित्र पुन्हा आपल्या दैनंदिन जबाबदारीकडे वळले.