भांबेडच्या पॅराप्लेजिक वरुण गोसावी याला आरएचपी फाउंडेशनचा मदतीचा हात

रत्नागिरी : वरुण विश्वनाथ गोसावी (रा. भांबेड ता. लांजा) यांचा आठ महिन्यांपूर्वी झाडावरुन पडुन अपघात झाला. केबलचे काम करण्यासाठी गावी आले होते. काम करताना चक्कर येऊन पडल्याने पाठीच्या मणक्याला मार लागला. तीन मणके फ्रॅक्चर झाले. कोल्हापूरला ॲस्टर आधार हॉस्पीटलमधे मणक्यावर ऑपरेशन झाले. पण कमरेपासून खाली सर्व संवेदना बंद झाल्या. युरीन मोशन कंट्रोल गेले. गेले आठ महिन्यापासून घरीच बेडवर झोपून आहेत. सीटला बेडसोअर असल्याने बसता येत नाही. पाठीचा बॅलन्स जातो. घरच्यांच्या मदतीने उठून बसावे लागते. सर्व विधी बेडवरच घरच्यांच्या मदतीने करावे लागतात.

वरुण गोसावी यांचे लग्न झाले असून पत्नी व मुलगी त्यांच्यासोबत राहतात. गोसावी हे मुंबईत खासगी कंपनीमधे वायरमन म्हणून कामाला होते. परंतु गावी कामासाठी आले आणि दुर्दैवाने त्यांना अपंगत्व आले. त्यांच्या औषधोपचारांसाठी लाखो रुपये खर्ची पडले आहेत. आता गुजराण कशी करावी असाही त्यांना प्रश्न पडला आहे. त्यांच्या या आजारची माहिती रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे (आरएचपी) अध्यक्ष सादीकभाई नाकाडे यांना कळताच त्यांनी वरुणची भेट घेतली. त्याची विचारपूस केली. त्याचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे आणि त्याच्या घरच्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी आरएचपी फाउंडेशनतर्फे व्हीलचेअर दिली. व्हीलचेअर वरुणच्या सोईची असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहुण घरचेही खुप खुश झाले.

त्याला युरीन मोशनचे प्रशिक्षण सादीकभाईने दिले. व्हीलचेअर देताना आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादीक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, वरुण गोसावी, आई वैष्णवी गोसावी, वडील विश्वनाथ गोसावी, भावोजी प्रमोद गुरव आणि भाऊ स्वप्नील गोसावी उपस्थित होते.