साखरपा : वार्ताहर
देवरूख–साखरपा मार्गावरील वांझोळे येथे सोमवारी रात्री खासगी आराम बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एक वृद्ध ठार तर २७ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातप्रकरणी आराम बस चालकावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण काशिनाथ येजरकर असे अपघातातील मृताचे नाव आहे.
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख- साखरपा मार्गावरील वांझोळे नजीक ट्रॅव्हल्स पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना उपचारासाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विमलेश्वर नावाची ट्रॅव्हल्स सिंधुदुर्गमधील देवगडहून मुंबईच्या दिशेने जात होती. देवरूख- साखरपा मार्गाने ही ट्रँव्हल्स वांझोळे येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्सने प्रथम समोरून येणाऱ्या छोट्या टेम्पोला धडक दिली यानंतर ट्रँव्हल्स रस्त्याच्या बाजूला जावून पलटी झाली.
या अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालय व साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमींना १०८ रूग्णवाहिकेतून रत्नागिरीतील जिल्हा शासकिय रूग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, रत्नागिरीत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या लक्ष्मण येजरकर (वय-६२, रा. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग) यांचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला आहे. तर सर्व जखमींवर आता रत्नागिरीत उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद देवरूख पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.












