नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल, रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांची घोषणा अद्यापही नाही
खेड(प्रतिनिधी) शिमगोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच नियमित गाड्यांचे आरक्षण झाले असून ४ एक्सप्रेसनाही ‘रिग्रेट मिळाला आहे. चाकरमानी प्रतीक्षा यादीवर असताना अजूनही रेल्वे प्रशासनाने ही स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे शिमगा सणाला गाव गाठायचे कसे या विवंचनेत चाकरमानी असून त्यांच्या नजरा होळी स्पेशल गाड्यांकडे लागल्या आहेत.
शिमगोत्सवात ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी गावी चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. यंदा १३ मार्चपासून शिमगोत्सवाची धामधूम सुरु होत आहे
कोकणकन्या जनशताब्दी , तुतारी एक्स्प्रेस गाड्यांना रिग्रेट मिळाल्याने चाकरमानी कोंडीत अडकले आहेत. १३ व १४ मार्चला धावणाऱ्या चारही एक्स्प्रेस गाड्यांचे आरक्षण देखील फुल झाले आहे. प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांच्या नजरा होली स्पेशल कडे लागल्या असून अद्यापही रेल्वेप्रशासनाने या जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे शिमगोत्सवास गावी येण्याच्या नियोजनावर तूर्तास तरी पानी फेरले गेले आहे. रेल्वे प्रशासनाने होळी स्पेशल फेऱ्या जाहीर करून चाकरमान्यांच्या मार्गातील नियोजनाचा अडथळा दूर करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.











