बंजारा समाज बांधवांनी संघटीत होवून आपले प्रश्नांसाठी लढा दिला पाहिजे- अड. सौ.हुस्नबानू खलिफे

राजापूरात संत सेवालाल महाराज जयंती साजरी

 

राजापूर (वार्ताहर): कष्टकरी बंजारा समाजातील मुलं मुली आता उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे येत असून बंजारा समाज सुशिक्षित होत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र बंजारा समाज बांधवांनी आपले प्रश्न सोडविण्यासाठी समाज म्हणून एकत्रीत येणे आवश्यक असून संघटीत होवून स्वत:च्या सर्वांगिण विकासासाठी लढा दिला पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार अड. सौ.हुस्नबानू खलिफे यांनी येथे केले.

बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघ राजापूर तालुका यांच्या वतीने २८६ व्या संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अड. सौ. खलिफे बोलत होत्या.

शहरातील गुजराळी येथील पाटील मळा येथील यशोदिन सृष्टी हॉलमध्ये बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघाचे अध्यक्ष धनसिंग मानू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यकमाला व्यासपीठावर माजी आमदार अड. सौ. हुस्नबानू खलिफे, ठेकेदार संघटनेचे रविकांत भामत, बौध्द समाजाचे नेते गणपत पन्हळेकर, महिला संघटक सौ. ज्योती राठोड, सौ. पार्वतीबाई राठोड, सौ. गिराबाई राठोड, संतोष राठोड, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर आदी मान्यवर उपस्थीत होते.

प्रारंभी उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन , संत सेवालाल महाराज यांचे प्रतिमा पूजन व धनसिंग चव्हाण यांच्या हस्ते होमहवन (भोग) करण्यात आले. त्यानंतर उपस्थीत मान्यवरांचे स्वागत सत्कार धनसिंग चव्हाण व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. तर धनसिंग चव्हाण यांचा अड. सौ. खलिफे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक धनसिंग चव्हाण यांनी करून बंजारा समाजाचे स्वप्न असलेले संत सेवालाल भवन तालुक्यात उभे करण्याचे काम लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी सर्वांचे सहकार्याची आवश्यकता आहे. आपला समाज हा कष्टकरी आहे. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपण कष्ट करत असतो. मात्र समाजाने आपले प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. एकत्र येवून आपले प्रश्न सोडविले पाहिजेत असे सांगितले. तर मोठया संख्येने उपस्थीत राहिल्याबद्दल समाज बांधवांना धन्यवाद दिले.

यावेळी गणपत पन्हळेकर व रविकांत भामत यांनी मनोगत व्यक्त केले. पन्हळेकर यांनी समाजाने शिक्षीत होणे आवश्यक असून व्यसनापासून दूर राहिले पाहिजे तर समाजाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. भामत यांनी तांडावस्ती निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर यांनी केले.

सकाळच्या सत्रात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेसह जकात नाका ते यशोदीन सृष्टी सभागृह अशी भव्य मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष ईश्वर राठोड, लक्ष्मण राठोड, काशिनाथ राठोड, किसन राठोड, धोंडीराम जाधव, नामदेव राठोड, संजय चव्हाण, विलास राठोड, बाळू जाधव, सुरेश राठोड, राजू राठोड, वामन राठोड, बाळू राठोड, रेणू जाधव, उमेश हुडेद, सचिन राठोड यांसह मोठया संख्येने बंजारा समाज बंधू भगिनी उपस्थीत होत्या.