शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रामदास कदम यांची चंपक मैदानावरील आभार सभेत चौफेर टोलेबाजी
रत्नागिरी | प्रतिनिधी : रत्नागिरी येथील चंपक मैदानावर आयोजित आभारयात्रा, पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांच्या शैलीत चौफेर टोलेबाजी केली. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन विधानसभा लढवली आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना घवघवीत यश मिळवून देताना संपूर्ण विश्वास दाखवला. परंतु उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना काळीमा फासला, पाठीत खंजीर खुपसला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि कायम राहणार. पण उद्धव ठाकरेंच्या सोबत कोण राहणार, ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले तेव्हाच सगळ त्यांनी घालवलं. आता बाप बेटे आरोप करत असतात.पण शिवसेना प्रमुखांसोबत शिवसेना उभी करण्यात या दोघांचे योगदान काय? यांना सगळ आयत मिळालं आहे. पण एकनाथ शिंदेना सतत बोलाल तर तुमचे लंडन, अमेरिका, श्रीलंकेत काय आहे हे उघड करू, असा थेट इशारा रामदास कदम यांनी भर सभेत दिला.
शिवसेना पक्षप्रमुख ही भगवी लाट पाहून आनंदित झाले असतील. आपले विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना ते स्वर्गातून भरभरून आशीर्वाद देत असतील. या उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना काळीमा फासला. शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? पण त्यांनी खा. नारायण राणे यांना मुख्यमंत्री बनवले, मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री बनवले. माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून वरती आलेला रामदास कदम त्याला त्यांनी महत्व प्राप्त करून दिले, शिवसेनेचा नेता केला. तर कोकणी माणसाने शिवसेना मोठी केली. याही पुढे कोकणात शिवसेनेवर इथली जनता नक्की विश्वास ठेवेल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरभरून यश देईल असा विश्वास सुद्धा रामदास कदम यांनी व्यक्त केला.












