शिवसेनेतील पक्षप्रवेशाचा तिसरा टप्पा लवकरच : पालकमंत्री उदय सामंत

राज्यमंत्री पदाच उपयोग जनतेचा विकास आणि पक्षवाढीसाठी : ना. योगेश कदम 

रत्नागिरी | प्रतिनिधी : 

विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरीसह रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट 95 टक्के इतका आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे रत्नागिरीत अनेक विकासकामे झाली, कोट्यावधींचा निधी आला. जनतेने निवडणुकीत विश्वास ठेवत घवघवीत यश दिले, आता शिवसेनेत येणार्यांची संख्या मोठी आहे. आज इथे झालेल्या पक्षप्रवेशाचा हा दुसरा टप्पा आहे. अजून तिसरा टप्पा बाकी असून लवकरच तोही पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे उद्योग, मराठी भाषा तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चंपक मैदानावर आयोजित आभार मेळाव्यात व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीला भरभरून विकास निधी दिला असे सांगताना जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही असा विश्वास दिला. तर जे पक्षात आले आहेत त्यांचा योग्य तो मानसन्मान होईल असेही ते म्हणाले. तर आजचे व्यासपीठ एकसंघ राहिले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल असा विश्वास ना. उदय सामंत यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनीही आपल्या मंत्रीपदाचा उपयोग कोकणसह जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी,पक्ष वाढीसाठी केला जाईल असे प्रतिपादन केले.