राजापुरातील जवाहर चौक ते रानतळे रस्त्याच्या दुरावस्थाकडे न. प. चे दुर्लक्ष

काम करण्याचे आदेश देऊनही काम सुरू नाही

धुतपापेश्वर यात्रेपुर्वी तरी रस्त्यावरिल खड्डे भरणार का?

राजापूर (प्रतिनिधी): शहरातील जवाहर चौक ते रानतळे या रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे. या रस्त्यात धोपेश्वर घाटी ते साखळकरवाडी या परिसरातील रस्त्याची तर पुरती चाळण झाली असून या भागात मोठया प्रमाणावर पडलेल्या खड्यावरून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. तर पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. याबाबत नागरिकांतुन वारंवार ओरड होऊनही न. प. प्रशासनाने त्याकडे लक्ष दिलेले नाही. तर ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश देऊनही त्याने काम सुरू केलेले नाही.

त्यामुळे धुतपापेश्वर यात्रेपुर्वी तरी या रस्त्यावरिल खड्डे भरावेत अन्यथा आता रस्त्यावर उतरू असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.

राजापूर शहराची भौगोलिक रचना ही चढ उताराची असून अनेकदा या प्रतिकुल भौगोलिक रचनेमुळे नागमोडी रस्ते आणि धोकादायक वळणामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याचे उदाहरण म्हणजे जवाहरचौक ते रानतळे रस्ता होय. राजापूर शहरातून नाटे गावखडी रत्नागिरीकडे जाणारा हा जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तिव्र चढ आणि तेवढाच उताराचा हा रस्ता आहे. त्यामुळे या रत्यावरून वाहन चालविताना चालकाला आपले कौशल्य पणाला लावावे लागते. अशातच गेल्या काही दिवसांत या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे. जवाहरचौकाकडून मार्गस्थ झाल्यावर खडपेवाडी मारूती नजीकच्या तीव्र चढ रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकाना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तर याच मार्गावर पुढे कोंबेकर घरापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या मार्गावर अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

शहरातील महत्वपुर्ण असलेल्या या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालक व पादचाऱ्यांतून करण्यात आलेली असताना न. प. प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. या रस्त्याला निधी मंजूर आहे, निविदा प्रक्रिया करून ठेकेदाराला काम करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पण ठेकेदाराने न. प. च्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

बुधवार २६ फेब्रुवारी रोजी समस्त राजापूर करांचे दैवत श्री देव धुतपापेश्वर येथे यात्रोत्सव आहे. या यात्रेला मोठया प्रमाणावर तालुका व तालुक्याबाहेरिल लोक गर्दी करतात. त्यामुळे या यात्रेच्या पुर्वी तरी या रस्त्यावरिल खड्डे भरले जाणार का असा सवाल वाहन चालकांतुन उपस्थित केला जात आहे. यापुर्वी या रस्त्यावरिल खड्डे भरण्याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा नागरिकांनी दिला आहे.