फोंडाघाट (प्रतिनिधी) :
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे सोमवार, दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी भव्य “महारोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने हा मेळावा पार पडणार असून स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
या मेळाव्यात मुंबई, पुणे, गोवा तसेच स्थानिक भागातील अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. सुमारे १००० पर्यंत रिक्त पदांसाठी थेट भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून बँकिंग, उत्पादन (MNC), ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, विमा, अकाउंट्स, बॅक ऑफिस अशा विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतील.
गोदरेज, मॅनिपाल बँक, LIC, MRF, स्कोडा, महिंद्रा अँड महिंद्रा, तसेच अधिराज प्लेसमेंट्समार्फत विविध बहुराष्ट्रीय कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, पॅराकोट पॉलिमर्स, एक्सेल ऑटोकाँप इंडस्ट्रीज प्रा. लि., बॉनफिग्लिओली ट्रान्समिशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अॅडविक ऑटोकाँप प्रायव्हेट लिमिटेड, आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सीटीसी ग्लोबल – कंडक्टर कोअर टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, स्टॅनले ब्लॅक अँड डेकर इंडिया प्रा. लि. यांसारख्या कंपन्यांकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या मेळाव्यात १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध असून महिलांसाठीही विशेष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सदर मेळावा सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत महाविद्यालय परिसरात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून मुलाखतीसाठी येताना स्वच्छ व औपचारिक पोशाख परिधान करावा. तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रांची फाईल, अद्ययावत बायोडाटाच्या किमान ५ प्रती, पासपोर्ट साईज फोटो व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. सतीश कामत (09422137252), डॉ. बाजीराव डाफळे (7972859693) आणि श्री. दीपक सावंत (9423053337) यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मा. महेश सावंत, सेक्रेटरी मा. चंद्रशेखर लिंग्रस, खजिनदार श्री. विठोबा तायशेटे तसेच संचालक मंडळ व महाविद्यालय विकास समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. भैय्याजी येरमे व जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सौ. प्रतिभा चव्हाण, फोंडाघाट व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगपतींची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
स्थानिक युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी केले आहे.












